निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागल्याच्या समाधानाने भगवा विसावला. आता राज्याभिषेक झाल्यानंतर फडकण्यासाठीच जागे व्हायचे असे त्याने झोपतानाच स्वत:स बजावले होते. आज अचानक जागा होऊन भगव्याने इकडेतिकडे पाहिले. तो गोंधळून गेला होता. डोळे चोळून      त्याने परिस्थितीचा अदमास घेतला. भगवा फडकणारच, असे म्हणणारी माणसे अनोळखी असल्यासारखी आसपास वावरत होती. भगवा खिन्न झाला. आता ‘ज्वलंत हिंदुत्वाचा       पुरस्कार’ कोण करणार अशी काळजीही त्याला वाटू लागली. ज्यांनी एके काळी आपल्याला खांद्यावर घेतले होते, ते तर दूरच दिसत होते. भविष्याकडे डोळे लावून सध्या स्वस्थ बसावे असे भगव्याने ठरविले, आणि तो पुन्हा घडीत जाऊन बसला. पण आता त्याला पुरती जाग आली होती. त्याची नजर आसपास भिरभिरत होती, आणि कानही जागे होऊन सभोवतीचे सूर टिपत होते. अचानक त्या कोलाहलात     आशेचा एक सूर ऐकू आला, आणि भगवा    पुन्हा ताजातवाना झाला. कोणत्या तरी वृत्तवाहिनीवर एक काहीसा ओळखीचा आवाज त्याच्या कानावर पडला. कधीकाळी त्या आवाजाच्या मालकानेही खांद्यावर आपल्याला घेतले होते, हे आठवले आणि भगवा कान देऊन ऐकू लागला. राजकारणात कुणीच कायमचे शत्रू नसते, असे शब्द भगव्याच्या कानावर पडले. पुढच्या साऱ्या घडामोडींचा अनुभवी भगव्याला लगेच अंदाज आला. आपण एकटे पडणार नाही, हे त्याने ओळखले. सद्य:स्थितीत, आपल्या  रंगाचा राजकारणाला मोठा उपयोग होणार हे त्यालाही माहीत होते. त्यामुळे काठी बदलली, ती पकडणारे हात बदलले, तरी आपण फडकत राहणार या विचाराने त्याने पुन्हा अंग झटकले आणि तो कानोसा घेऊ लागला. आता   इंजिनाच्या जागी राजमुद्रा येणार, निळी-हिरवी पट्टी जाऊन आपण आपल्या रंगाने मिरविणार, हेही त्याला कळून चुकले. ज्यांनी कालपरवापर्यंत आपल्याला मिरविले, त्यांनी आपली साथ सोडल्याने झालेली पोकळी पुन्हा भरण्याचा हा प्रकार भगव्याने अनुभवाने ओळखला. आता  ज्या खांद्यावर आपण असू, तेथेही ज्वलंत हिंदुत्वाचा पुकारा होणार हेही त्याला माहीत होते. शिवाय, साक्षात शिवरायांची राजमुद्रा     आपल्याला मिरवता येणार या विचाराने   भगव्याची छाती इंचाइंचाने अधिकच फुगली. त्याने घडी मोडून बाहेर पाहिले. कमळ  मिरवणाऱ्या दुसऱ्या भगव्याला त्याने चाचरतच साद घातली. आता त्याला आपली जुनी मत्री आठवेल आणि आपण पुन्हा गळ्यात गळा     घालू, असे या भगव्याला वाटत होते. पण कमळवाल्या भगव्याने त्याची हाक ऐकली   की नाही, ते त्याला कळलेच नाही. पण आता माघार घ्यायची नाही. हाका मारतच राहायचे,  असा त्याने निश्चय केला. आपल्या अंगावरची नवी ‘राज’मुद्रा पाहून तरी त्या कमळधारी भगव्यास आपली मत्री आठवेल आणि पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून आपण नव्या मदानात मिरवू, असे विचार राजमुद्राधारी भगव्याच्या मनात रुंजी घालू लागले.. त्याने तिरप्या नजरेने मंत्रालयाकडे पाहिले. तेथील लगबगीकडे दुर्लक्ष करून त्याने पुन्हा साद घातली.. अंगावरची नवी ‘राज’मुद्रा मिरवत तो फडकू लागला..