12 December 2017

News Flash

थोरांची ओळख

सर्व थोर नेते हे कोणत्या ना कोणत्या तरी गावात गरीब किंवा श्रीमंत कुटुंबात जन्मलेले

लोकसत्ता टीम | Updated: July 19, 2017 2:15 AM

तर मुलांनो, आज किनई आपण आपले लाडके नेते व्यंकय्याजी नायडू यांची ओळख करून घेणार आहोत. ते खूप थोर नेते आहेत. कारण ते आपले नेते असून, शिवाय ते आता उपराष्ट्रपतीसुद्धा होणार आहेत. त्यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर या गावामध्ये झाला. सर्व थोर नेते हे कोणत्या ना कोणत्या तरी गावात गरीब किंवा श्रीमंत कुटुंबात जन्मलेले असतात. तेथे ते कंदिलाच्या उजेडात अभ्यास करतात. जे नेते शहरांत जन्मतात ते म्युन्सिपालिटीच्या दिव्यांखाली बसून ज्ञान मिळवितात. मुलांनो, आपण नेते नसल्याने आपण मात्र घरातच बसून अभ्यास करावा. व्यंकय्याजींनीही अशाच प्रकारे कठीण परिस्थितीत अभ्यास केला. मात्र ते लहानपणी नदी ओलांडून शाळेत जात नसत व एकदा एका विद्यार्थ्यांला वाचविण्यासाठी त्यांनी मगरीशी लढाईही केली नव्हती. मात्र मोठेपणी त्यांनी सरकारविरोधात खूप खूप लढाया केल्या व मग ते सरकारमध्ये गेले. आता ते सरकारमधून लढाया करतात. ते कोणाबरोबर हे मात्र मुलांनो तुम्ही विचारू नये व कोणी सांगू नये. कदाचित आपले आणखी एक थोर नेते लालकृष्णजी अडवाणीजी हे ते सांगू शकतील. आता हे कोण म्हणाले, की अडवाणीजी कोण? मुलांनो, हा प्रश्न आजच्या काळास साजेसा असला, तरी तो विचारायचा नसतो. कारण की अडवाणीजी हे देशाचे मार्गदर्शक मंडलाधिपती आहेत. तर आपण बोलत होतो, व्यंकय्याजींबद्दल. ते थोर नेते असूनही अत्यंत विनम्र आहेत. म्हणून तर त्यांनी उपराष्ट्रपतीपद स्वीकारले. अन्यथा त्यांना का राष्ट्रपती होणे आवडले नसते? परंतु देवाने आपणांस जे दिले ते त्याचा प्रसाद म्हणून मनोभावे स्वीकारावे, अशीच त्यांची बालपणापासूनची भावना आहे. बालपणी ते शाखेत जात. तेथील ‘शिवाजी म्हणतो’ हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ. मोठेपणीसुद्धा ती आवड कायम होती. मोठेपणी ते आधी ‘अटलजी-अडवाणीजी म्हणतात’ हा खेळ खेळले. आता ते ‘मोदीजी म्हणतात’ हा खेळ खेळतात. मोदीजी म्हणजे आपले प्रधानसेवक व स्वच्छतेचे ठेकेदार. एकाच वेळी ते अनेक रूपांत असतात व ज्यांची जशी भक्ती त्यांना तसे दिसतात. व्यंकय्याजी यांना एकदा मोदीजी यांनी ईश्वरी भेट या स्वरूपात दर्शन दिले होते. मोदीजी ही देशास मिळालेली दैवी देणगी आहे असे ते म्हणाले होते. ते ऐकून अनेक लोक अक्षरश: गहिवरले. खऱ्या भक्तीमध्ये ही ताकद असते, मुलांनो. तेव्हा मनोभावे भक्ती करा. सतत असे भेटी लागे जीवा लागलीसे ओढ असे वाटत राहिले पाहिजे. म्हणजे मग कधी ना कधी छानशी भेट मिळते. होय होय, मुलांनो, रिटर्न गिफ्ट मिळते..

First Published on July 19, 2017 2:15 am

Web Title: venkaiah naidu vice president candidate journey of venkaiah naidu