राजधानीतल्या त्या कार्यक्रमाचा थाट काय वर्णावा! व्यवस्थेत आणि आयोजनात स्वत:ला आजन्म वाहून घेतलेल्यांनीही ज्यातून धडे घ्यावेत, असा तो कार्यक्रम. महामहीम उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. व्यंकय्याजी आपला मुद्दा किती उत्तम मांडू शकतात, हे सुज्ञांना सांगायला नको. तरीही विनाकारण वाद घालण्याच्या सवयीनुसार काही जण खुसपटे काढतीलच. प्रश्न विचारणे हा हक्कच समजतात हे विघ्नसंतुष्ट. ते विचारतीलच प्रश्न. उदाहरणार्थ, ‘सुज्ञ म्हणजे काय? ‘सुज्ञांना’ म्हणजे कुणाला सांगायला नको? त्यापेक्षा सांगतच का नाही? अर्थात, यावर उत्तरेही तयार आहेतच : मे २०१४ पर्यंतची काळीकुट्ट कारकीर्द ज्यांना माहीत आहे, ते सगळे सुज्ञ. या सुज्ञांनी त्या काळात व्यंकय्यांजींना खूप वेळा पाहिले आहे, कान देऊन त्यांचे म्हणणे ऐकले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असले की दर दुपारी व्यंकय्याजी चित्रवाणी वाहिन्यांवर हमखास दिसत. आज विरोधी पक्षांनी सरकारला कसे पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने न ऐकताच आम्ही कसा सभात्याग केला, हे व्यंकय्याजींकडून ऐकणे म्हणजे बौद्धिक आनंदाची पर्वणी असे. असो. मुद्दा हा की, व्यंकय्याजी किती स्पष्टपणे मुद्दे मांडतात, हे सुज्ञ जाणतात. अशा व्यंकय्याजींचे पुस्तक मुद्देसूदच असणार.. आणि अशा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखणाच असणार, हे ओघानेच आले. इतका चांगला ग्रंथ (व्यंकय्याजींनीच, समारंभात सांगितलेल्या आकडय़ाप्रमाणे) १३० कोटी भारतीयांच्या हाती देताना राष्ट्राचा जो भूतकाळ काळाकुट्ट होता, त्याची किंचितही छाया व्यासपीठावरल्या कुणाच्याच मुखावर नव्हती. आता साऱ्यांचे लक्ष होते भविष्याकडे. त्याचे सूतोवाच व्यंकय्याजींनीच केले. राष्ट्र पुढे न्यायचे असेल, तर आधी संसद सदस्यांना सभागृहाच्या आत आणि बाहेर अशी दोन्हीकडे शिस्त हवी.. अहाहा! किती थेट, किती पारदर्शक मुद्दा!! कल्पना करा, दोन्ही सभागृहांतील सदस्य पूर्ण गणवेशात उपस्थित आहेत, अवघे वातावरण बौद्धिक आहे, आपले पंतप्रधान म्हणजे ईश्वरी देणगी हे व्यंकय्याजींनी कोणत्याही पदावर नसूनही केलेले विधान सभागृहांत जणू जिवंत झालेले आहे, कामकाज दिवसापुरते संपल्यावरही शिस्तीने एका रांगेत बाहेर पडताहेत आणि आपापल्या(च) निवासस्थानी गेल्यानंतरही पाटावर बसून,  शिस्तीने शाकाहारी भोजन करताहेत आणि उगाच चित्रवाणी चर्चामध्ये न रमता, पहाटे ‘योगा’ करण्यासाठी रात्री लवकर झोपत आहेत.. ही यादी वाढवता येईल. कुणा नतद्रष्टांना यात संसदेचा अवमान वा सदस्यांचा हक्कभंग वगैरे दिसेल पण शिस्तीवर सारी भिस्त असेल, तर शिस्तमय जीवनाचे पर्याय आपल्यापुढे असावेत, म्हणून ही यादी. तीही नको, तर चीनने चिनी राजकीय स्वच्छतेसाठी अलीकडेच १४२ कलमांची शिस्त-संहिता मंजूर केली आहे, ती बाकीच्या सामानासह आयात करता येईल..

..पण नाही! तसे होणे नाही, हेही सुज्ञ जाणतात (उत्तर वरीलप्रमाणे). त्या काळय़ाकुट्ट भूतकाळाची छाया जणू भविष्यावरही आहे आणि ईश्वरी देणगीने ती जणू ओळखली आहे.. म्हणूनच जणू आकाशवाणी झाली, ‘शिस्तीबद्दल हल्ली बोलले तर लोक हुकूमशहा म्हणतात’.