एकदा का माणसाच्या महान कर्तृत्वाचा त्याच्या प्रदेशाशी संबंध जोडला, की सगळे प्रश्न कसे वेगळ्याच पातळीवरून सोडवता येतात. बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशीही जेव्हा त्याच्या प्रदेशातील, जातीधर्मातील लोक उभे राहायला लागतात, तेव्हा हे भूमिपुत्र असणे किती फायद्याचे असते, हे लक्षात येते. आता ऐशोआरामात राहणाऱ्या विजय मल्या यांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांनी सगळ्यांचे कान आणि डोळे तृप्त होत असतानाच, त्यांच्याही पाठीशी असे भूमिपुत्र असण्याचे भाग्य फळफळेल, असे कुणाला तरी वाटले होते का? पण मल्या यांच्या कर्तृत्वात सहभागी असलेल्या अनेकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी मात्र आपले भूमिपुत्राचे कढ चांगलेच उकळून काढले आहेत. ‘खबरदार, कुणी मल्या यांना वाईटसाईट बोलाल तर!’, अशा थाटात हे माजी पंतप्रधान बऱ्याच काळानंतर कोणत्या का कारणाने होईना, पण उजळून निघाले म्हणायचे. मल्या यांना भारतातून बाहेर जाऊ देण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्याच्या तयारीत असलेल्या विव्हळणाऱ्या बँकांच्या हातावर तुरी (तीही हल्ली खूप महाग पडते..) देऊन हे महाशय लंडनला कधी रवाना झाले, ते कुणाला कळलेही नाही. चॅनेलीय चर्चामध्ये ‘पळून गेले’ अशी ओरड सुरू झाली आणि एरवीही शांतपणे निद्राधीन असलेल्या देवेगौडा यांना मल्या हे आपल्या भूमीचे विजयी पुत्र असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी आपली निद्रा आणि मौन असे दोन्ही एकाच वेळी सोडले आणि ते (कंसात तलवार उपसून वगैरे) एकदम तुटून पडले. मल्या हे भूमिपुत्र असून ते देश सोडून पळून गेलेले नाहीत. त्यांच्या कर्जबुडवेगिरीशी संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणेशी सहकार्य करण्याचीही त्यांची तयारी आहे. मग ते पळून गेले, असा आरोप करून त्यांच्या पांढऱ्याशुभ्र कपडय़ांवर बिअरचे शिंतोडे का बरे उडवता, असा देवेगौडा यांचा सवाल आहे. विजय मल्या आणि त्याच्या कर्जाशी दुरूनही संबंध नाही, अशांनाही ज्यामध्ये कमालीचा रस आहे आणि ज्यांच्या लेखी तो एक कर्जबुडव्या आहे, त्यांना देवेगौडा यांना झालेला हा भूमिपुत्राचा साक्षात्कार आश्चर्य वाटायला लावणारा आहे. पण जेव्हा कोणत्याही व्यावहारिक प्रश्नांना अशी भावनिक झालर लाभते, तेव्हा त्या प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचेही स्वरूप पालटायला लागते. राज्यसभेचे खासदार होण्यासाठी मल्या यांना राजकीय मदत करताना त्यांच्या तिजोरीचे दार किलकिले झाले होते, असल्या फडतूस आरोपांना उत्तर देण्याऐवजी त्यांचे भूमिपुत्र असणे अधिक महत्त्वाचे आणि राष्ट्रप्रेम सिद्ध करणारे आहे, असे बहुधा देवेगौडा यांना वाटले असावे. देशातील कोणत्याही गुन्हेगारास अशा रीतीने भूमिपुत्र असल्याचे प्रशस्तिपत्र देण्याच्या या नव्या खुळाने सारे नादावतील, असेही त्यांना वाटले असेल, कुणास ठाऊक!