मुंबई, दि. ७ – डब्लू ए विश्वविद्यालयाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये ‘प्राचीन बॉलीवूड संस्कृतीतील तारे-तारकांचे अवकाशविज्ञान या विषयावर टीप लिहा’ असा प्रश्न विचारण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून, अशी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापक चमूवर कारवाई करावी, अशी मागणी विविध अवकाश-नगरांतील इतिहासविज्ञानाच्या प्राध्यापकांच्या संघटनेने केली आहे. दुसरीकडे अशी मागणी करणारे इतिहासविज्ञानकार हे समाजामध्ये चुकीचा इतिहास पसरवू पाहत असून, त्यांना बॉलीवूड संस्कृती पुसायची असल्याचा जोरदार आरोप करीत येथील इतिहास पुनर्लेखन मंडळाने या वादात उडी घेतली असल्याचे आमचा हस्तिनापूर अवकाश-स्थानकातील वार्ताहर कळवतो. याबाबतची सविस्तर माहिती अशी, की येथील डब्लू ए म्हणजेच व्हाटस्याप विश्वविद्यालयात सध्या पंडितश्री या तीन सप्ताहांच्या अभ्यासक्रमातील ‘एंटायर पॉलिटिकल सायन्स इन एन्शन्ट मुंबई’ या विषयाची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. या परीक्षेलाही प्राचीन इतिहास असून, एकविसाव्या शतकात मुंबई विद्यापीठाने त्यात मोठेच कीर्तिमान प्रस्थापित केले होते असे सांगण्यात येते. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत  सदरहू वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आला. प्राचीन काळी मुंबईसह संपूर्ण भारतात ठिकठिकाणी बॉलीवूड संस्कृती होती. ही संस्कृती अत्यंत प्रगत होती व आयटी क्रांती पूर्व इसवी सन १९६०च्या दशकातच या संस्कृतीने अवकाश दळणवळण क्षेत्रात प्रचंड प्रगती केली होती. त्या काळी लोक सहज फिरायला जावे त्याप्रमाणे परग्रहावर जात असत. तसेच परग्रहांशी त्यांचा कायमचा संपर्क असे, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे मत इतिहास पुनर्लेखन मंडळाने अलीकडेच झालेल्या आंतरग्रहीय विज्ञान परिषदेत मांडले होते. एका प्राचीन ग्रंथातील ‘तू अब से पहले सितारों मे बस रही थी कहीं, तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिये’ या उल्लेखातून ते स्पष्ट होत असूनही त्याला येथील काही राष्ट्रविरोधकांचा विरोध आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना बॉलीवूड संस्कृतीच अमान्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. असाच प्रकार पूर्वी भारतातील बनारस या पवित्र शहरात घडला होता. तेथील विद्यापीठाने कौटिल्याच्या जीएसटीवरील विचारांवर एक प्रश्न विचारला होता. हे कौटिल्य कोण व जीएसटी म्हणजे काय याचा शोध सुरू आहे. परंतु त्या प्रश्नावरून तेव्हाही असाच गदारोळ उठला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती असून, तेव्हाच्या विरोधकांना ज्याप्रमाणे गप्प करण्यात आले होते, त्याचप्रमाणे या विरोधकांनाही गप्प व्हावे लागेल, असे पुनर्लेखन मंडळाच्या एका सदस्याने नाव ठळक अक्षरात प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, या वादावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास व्हाटस्याप विद्यापीठाने तयारी दर्शविली आहे.