13 December 2018

News Flash

सकारात्मक काही छानछानसे

परंतु व्यवसायभूत भोचकपणा शांत बसू देईना.

अनुष्का शर्मा

धन्यवाद देवा! (म्हंजे थँक्गॉड!!) असे चीत्कारवजा उद्गार कानी आल्याने दचकून पाहिले असता आमच्या चर्मचक्षूंना एक नवब्रॅण्डेड तरुण दिसला. त्याला आम्ही दिसण्याचे कारणच नव्हते. कां की त्याचे दोन्ही डोळे हातातील विचलध्वनियंत्राच्या पडद्याला खिळलेले होते. कर्णेद्रियात दोन पांढरी बोंडे खोवलेली होती. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. एरवीही ही तरुण पिढी कुणाचे काही ऐकून घेत नाही. तेव्हा त्यास आकाशीच्या बाप्पाची उचकी का लागली हे विचारण्यात अर्थ नव्हता.

परंतु व्यवसायभूत भोचकपणा शांत बसू देईना. अशा वेळी चाळीतल्या खिडक्यांतून जाता-येता डोकावण्याची जुनी सवय कामी येते. त्याच्या विचलध्वनीमध्ये डोकावून पाहिले असता समजले, की तो विरुष्काची फेसबुकन्यूज वाचत होता. व त्यायोगे त्याच्या मनास मोद विहरतो चोहीकडे असे झाले होते. आता कोणी पुसेल, की बोवा, ही विरुष्का काय भानगड आहे? एखाद्याच्या मनातला अज्ञान अंधकार अधिकच तीव्र असेल, तर त्यास असेही वाटून जाईल की हे एलजीबीटी नाम तर नव्हे? परंतु ते तसे नाही. चि. विराट कोहली आणि चि. सौ. अनुष्का शर्मा या नवपरिणित जोडप्याचे ते जोडनाव आहे.

तर त्यांची बातमी अशी होती, की त्यातील चि. विराट हा आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालून जेहत्ते कालाचे ठायी फिरत आहे. म्हणजे त्याने आपली लग्नाची अंगठीच गळ्यात घातली आहे. चिवित्रच वृत्त म्हणावयाचे हे. परंतु त्यात त्या जगन्नियंत्यास धन्यवादण्याचे काय बरे कारण? तेव्हा न राहवून त्या तरुण तडफदारास पुसले असता तो म्हणाला, व्वा. म्हणजे किती दिवस आम्ही वाचायच्या त्याच त्या बंदच्या व दलितांवरील अन्यायाच्या व अग्निसुरक्षेच्या व बेरोजगारीच्या व तत्सम बातम्या? काय रोज बोअर मारून घ्यायला बसलोय का आम्ही? यातील बोअर मारणे याचा विंधनविहिरींशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याविषयी विचार करू लागता आम्हांस त्याचे म्हणणे पटले व वाटले, की एरवीही ही समस्त माध्यमे किती नकारात्मक बातम्या देत असतात. सतत आमच्या लाडक्या नेत्यावर टीका, म्हणजे नकारात्मकच. त्यांना सकारात्मक काही दिसतच नाही.

म्हणजे विराटजींनी इटलीत विवाह केला म्हणून त्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला तर त्यास प्रसिद्धी देणार आणि त्याने गल्यात साखली अंगठीची म्हणत एवढी सामाजिक क्रांती केली, तर त्याकडे दुर्लक्ष करणार. गोवंश बंदीवरून तमाशे करणार आणि एका गाईने तीन वासरांस जन्म दिला तर त्याची चक्क वृत्तहत्या करणार. यास काय बरे अर्थ?

खरे तर बातम्या अशाच असाव्यात की ज्या योगे समाजात हर्षोल्हासाचे, आनंदाचे, विकास होत असल्याचे, चांगले दिवस आल्याचे लोकांच्या मनास दिसेल. परंतु एवढी सकारात्मकता कोठून यायला? गेल्या काही दिवसांपासून तर फारच वांधे केले आहेत काही लोकांनी या सकारात्मकतेचे. या साचून राहिलेल्या नकारात्मकतेतून विरुच्या अंगुष्टीसूत्राची बातमी आली आणि अभावितपणे त्या ब्रॅण्डेड नवयुवकाने आपल्या सर्वाच्याच मनची बात बोलून दाखवली, की – थँक्गॉड!

First Published on January 5, 2018 3:09 am

Web Title: virat kohli wears wedding ring around his neck