‘‘तीन कोटी एकऽ, तीन कोटी दोनऽऽ आणि तीन कोटी तीनऽऽऽ’’ असे शब्द कानावर पडताच हर्षवायू झालेले पाटील दोन्ही हात वर करून उभे झाले व त्यांच्या समर्थकांनी ढोलताशे बडवायला सुरुवात केली. चहुबाजूंनी गुलालाची उधळण सुरू झाल्याबरोबर त्यांच्या डोक्यात आर्थिक गणिताने फेर धरायला सुरुवात केली. पंचायतीला केंद्राकडून मिळणारा निधी, शिवाय राज्याकडून येणारे पैसे, त्यातून विकासाचा देखावा उभा करून मिळणारी टक्केवारीची रक्कम किती असेल, याचा अंदाज त्यांना आला. एका हाताने तीन कोटी द्यायचे व दुसऱ्या हाताने काढायचे याचा हिशेब त्यांनी क्षणात जुळवत आणला. थोडीफार तूट आलीच, तर दोन सार्वत्रिक निवडणुका आहेतच की! हे लक्षात येताच त्यांना हायसे वाटले. म्हणे, निवडणूक बिनविरोध करा, निधी देऊ. अरे, तुम्ही काय निधी देणार? आता गावची तीन हजार मते हवी असतील तर मी सांगेन तेवढा पैसा मोजण्याची तयारी ठेवा. यातून अध्र्यापेक्षा जास्त रक्कम वसूल करायची असे त्यांनी त्या क्षणी ठरवून टाकले. या लिलावाने निवडणुकीची घणघणच संपवून टाकली हे बरे झाले. प्रचाराच्या काळात याचे पाय धर, त्याला दादापुता कर, अमक्याला नोट दे, तमक्याला सामान दे.. हे करताना किती श्रम पडायचे. शिवाय पैसाही पाण्यासारखा जायचा. त्यापेक्षा हे बरे! एकरकमी पैसे भरा व तसेच आडमार्गाने वसूल करा. ना हाक, ना बोंब! वरून जहागीरदारी विकत घेतल्यासारखा आनंद वेगळाच. तसेही लिलावात आपला हात कुणी धरू शकत नाही. मग तो कांद्याचा असो वा वाळू घाटाचा. शेवटी राजकारण, सत्ताकारण हासुद्धा एक व्यापारच की! तशीही देश विकायला काढल्याची हाकाटी सुरूच आहे. आपण तर फक्त गाव.. हा विचार मनात येताच पाटलांची जीभ चावली. समजा, नाही वसूल झाले तीन कोटी आणि हा व्यवहार आतबट्टय़ाचा जरी ठरला, तरी काही फरक पडत नाही. पद लहान असले तरी सुरुवात दमदार झाली ना! आजी म्हणायची, एक दिवस तू राज्याचे नेतृत्व करशील.. तिथवर पोहोचेपर्यंत लिलावाला अधिकृत मान्यता मिळालेली असेल. ही कल्पना मनात येताच पाटलांना हसू फुटले. पैसा काय, आज नाही तर उद्या कमावता येईल. राजकारणातील प्रगती महत्त्वाची. आता तर ज्याच्या हाती पैसा त्यालाच विकासाची दृष्टी असे मानण्याचे दिवस आलेत. उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरीच्या फंदात न पडता ठरवून गावाकडे वळलो. शेतीकडे व्यापार म्हणून बघितले म्हणूनच हे दिवस बघता आले. आता लोककल्याणाच्या गप्पा मारत व्यापार करायचा असे पाटलांनी ठरवून टाकले. म्हणे, हा तर लोकशाहीच्या पायावरच आघात, लोकशाही धोक्यात. अरे, तिकडे मुंबई-दिल्लीत यापेक्षा वेगळे काय होते? तिथेही पडद्याआडून देवाणघेवाण चालतेच ना! सभागृहात नोटांची बंडले बघितलीच ना सर्वानी. तो धोका नव्हता काय? इथे आम्ही फक्त पडदा काढून टाकला. जे केले ते लोकांच्या साक्षीने. सर्वाच्या समक्ष. तसेही गावात काही घडले की बोंब मारण्याची सवयच आहे सगळ्यांना. ही लोकशाहीची थट्टा नाही, विकासाची बोली आहे. आणि कारवाई करायचीच असेल तर ते बिनविरोधाचे पिल्लू सोडणाऱ्यांवर आधी करा. आमचे गाव आहे, आम्ही बघून घेऊ. कायद्याच्या कचाटय़ातून कसे सुटायचे तेही बघून घेऊच की! विचार करता करता पाटील मिरवणुकीसह घरी पोहोचले. सारे समर्थक पांगल्यावर त्यांनी टीव्ही सुरू केला, तर तिथे आयपीएलसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव सुरू होता. त्यातला रिचर्ड मॅडलेची बोली पद्धत त्यांना बेहद्द आवडली. लगेच त्यांनी ठरवले. पाच वर्षांनंतर मॅडलेला पंचायतीत बोलवायचेच! पैशासाठी तो थोडीफार मराठी शिकेलच की!