बरे का मंडळी, या विश्वामध्ये दुखे अनंत आहेत. वेदना अथांग आहेत. चिंता-काळज्या अमर्याद आहेत. आमच्या पूर्वसुरींनी हे म्हणूनच ठेवले आहे, की सुख पाहता जवापाडे दुख पर्वताएवढे. म्हंजे काय, तर जगी सर्व सुखी असा कोणीच नसतो. काय? तेव्हा भगवंताने काय सांगितले आहे की सुखदुखे समे कृत्त्वा.. अर्थात सुख आणि दुखाला समान मानून युद्धास लागावे. हे युद्ध काही कुरुक्षेत्रावरचेच नाही मंडळी. हा जीवनसंघर्ष आहे. त्यात स्थितप्रज्ञ वृत्तीच हवी. परंतु सध्या जमाना कलीचा आहे. या कलीकाळावर मात करायची असेल ना, तर मंडळी एकच उपाय आहे. तो म्हणजे स्थितप्रज्ञता सोडून आनंदावस्थेत जाण्याचा. फार कठीण आहे हा मार्ग. सहजसाध्य तर मुळीच नाही. काही संशयात्मे यावर म्हणतील, की बुवा काहीही बोलतात. सातत्याने अशी आनंदावस्था प्राप्त करणे कसे जमावे? ते का केळ्याचे शिकरण खाण्याएवढे सोपे आहे? परंतु मंडळी जे श्रद्धावान असतात त्यांना या जगी काहीही अशक्य नसते. या संदर्भाने पाहा, आजच एका वृत्तपत्री सुंदरसा दृष्टांत देण्यात आलेला आहे. त्यात लिहिले आहे की, या जगतामध्ये असे काही लोक आहेत, की जे चालता चालता त्यांच्या चारचाकीतून उतरतात आणि भर रस्त्यामध्ये त्या चालत्या चारचाकी वाहनासमवेत नाचू लागतात. हा दृष्टांत वाचला आणि मंडळी आम्ही तर थक्कच झालो. अहो, केवढी ही साधना. चालत्या वाहनातून उतरून भर रस्त्यात नाचावेसे वाटावे. तेही कोणाचीही पर्वा न करता.. की आपल्या मागून अनेक वाहने येत आहेत. संभवत अपघात होऊ शकतो. आपल्या प्राणांचे काही बरे-वाईट होऊ शकते.. कश्शाची म्हणून काळजी नाही. कोठून येत असेल त्यांच्या मनात ही आनंदावस्था? एक प्रकारची दिव्य माणसेच म्हणावी लागतील ही. तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांचे पाहा. एक तर हल्ली रस्त्यावरून साधे चालतानाही मनात नाना काळज्यांचे जंजाळ असते, की कुठल्याशा गटारद्वारातून तर हा देह गडप होणार नाही ना? खाली पाहून चालावे, तर वरून एखादे झाड तर अंगावर कोसळणार नाही ना? एखादे वाहन धडकणार नाही ना? पूलच खचणार नाही ना? हे तर हे, पण त्या रस्त्यांवरच्या खड्डय़ांचे काय? तेथून साधे चालणे कठीण. पण हे वाहनचालक त्यातून मार्ग काढणार. वाहतूक कोंडी होणार. केवढा तो संघर्ष? एवढे सगळे भोगताना त्या वाहनाधिपतींना जगणे नकोसे वाटते, तेथे हे दिव्य लोक गाडीतून उतरून नाचू लागतात! अहाहा! जीवन यांनाच कळले हो!.. कोणी तरी सांगत होते, यास किकी चॅलेंज असे म्हणतात व ते पाश्चात्त्य देशांतून आपल्याकडे आले आहे. पाश्चात्त्यांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असताना.. म्हणजे त्यांची वाहतुकीची शिस्त, नियम पाळण्याची भीरू वृत्ती.. आपण नेमके कसे असे निके सत्त्वच उचलतो नाही? वा! तेव्हा मंडळी, शिकायचे असेल तर या दिव्य लोकांकडून शिकावे. त्यांचे बौद्धिक दिव्यांगत्व आपल्याही अंगी बाणवावे. म्हणजे सगळे जीवनच कसे किकी चॅलेंज होऊन जाईल. आपण जगता जगता नाचत राहू. जगणे म्हणजे सगळाच आनंदीआनंद होऊन जाईल. या आनंदात ते पोलीस का खो घालत आहेत कोण जाणे? किकी चॅलेंजमधून मिळणाऱ्या आनंदाच्या व कधी कधी अंतिम मोक्षप्राप्तीच्या आड ते का येत आहेत? यमधर्माच्या आड येऊ नये त्यांनी.