News Flash

वाढदिवसयोग!

थोडे स्थिरस्थावर झाल्यावर काँग्रेसचे अनेक मोहरे गळाला लागले असते.

२२ जुलैच्या रात्री साडेअकरा वाजता दादांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल येतो. स्क्रीनवर भाऊंचे नाव दिसताच ते आतल्या खोलीत जातात. फोन घेताच पलीकडून ‘त्या’ पहाटेची आठवण करून देणारा आवाज येतो. ‘दादा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’ ‘धन्यवाद, तुम्हाला पण शुभेच्छा’ असे म्हणत दादा क्षणकाळ थांबतात. नेमकी तीच संधी साधून भाऊ सुरुवात करतात. ‘जन्मतारखेचा योग नियतीने जुळवून आणला पण सत्तेचा योग काही जुळून आला नाही याचे राहून राहून वाईट वाटते. एकत्र असतो तर काय टेचात राज्य केले असते आपण. ती आज उड्या मारणारी सेना अर्धीही राहिली नसती. गलितगात्र काँग्रेस विरुद्ध धडाडीने काम करणारे आपण, हे चित्रच वेगळे दिसले असते. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर काँग्रेसचे अनेक मोहरे गळाला लागले असते. म्हणजे आज जशी तुमची संख्याबळाची पोझिशन आहे तशीच आपलीही राहिली असती. पण योगच नव्हता. ना तुमच्या ना माझ्या नशिबात. तुम्ही कच…’ भाऊंचे वाक्य मध्येच तोडत दादा म्हणतात, ‘तुमचे म्हणणे योग्य, पण साहेबांसमोर काहीच चालले नाही त्याला काय करणार? तो तिकडचा संपादक भलताच चतुर आहे. सारखा त्यांच्या कानाला लागत असतो. शिवाय ५२च्या यादीतले अनेक पटापट गळू लागल्यावर काही पर्यायच उरला नाही. आता त्यातलेच अनेक जण येतात. दादा तुमचे बरोबर होते असे म्हणतात. एवढेच काय माझे काही सहकारीसुद्धा आता माझी ती कृती योग्य ठरवू लागलेत.’ हे ऐकताच भाऊ अधीर होऊन दादांना विचारतात, ‘म्हणजे तुम्ही खूश नाही या सत्तेत’ क्षणकाळ थांबून दादा म्हणतात, ‘नाही…’ थोडा वेळ शांततेत जातो. मग दादा बोलतात, ‘खरे सांगा, आपल्या या संवादात ती पेगॅसस वगैरेची काही भानगड नाही ना.’ त्यावर भाऊ तत्परतेने उत्तरतात, ‘नाही नाही. जिथे आशा कायम आहे अशा ठिकाणी आम्ही विश्वासाला फार महत्त्व देतो. हा संवाद केवळ आपल्यातला राहील याची हमी मी ‘या ठिकाणी’ देतो. बरं, ती तुमची नाखुशी नेमकी कशा स्वरूपाची आहे?’ हा प्रश्न ऐकताच दादा चमकतात. ‘अहो, सारा लहरी कारभार आहे. निर्णय घेणे आणि फिरवणे यातच वेळ चाललाय. धडाडी नावाची गोष्टच नाही. अनेकांचा वेळ तर ‘ते’ काय म्हणतील यावर विचार करण्यातच जातो. कारभाराचा गाडा हाकताना तुमची नक्कल ते करायला जातात… सारी सूत्रे एकवटणे वगैरे. पण प्रत्येकालाच नक्कल जमते थोडीच.’ हे ऐकून सुखावलेले भाऊ जोरात हसतात. ‘हो, येतेय ते आमच्या लक्षात. एकहाती सत्ता सांभाळणे सोपी गोष्ट नाही. यात तुमची होणारी घुसमट मी समजू शकतो पण पर्याय काय? त्यावरही विचार करा दादा आता तुम्ही.’ हे शब्द कानावर पडताच दादा सावध होतात. ‘पर्याय काय हे तुम्हालाच चांगले ठाऊक. आमचेही लोक सतत भुणभुण करत असतात पण सारे काही साहेबांवर अवलंबून.’ हे ऐकताच भाऊ एक दीर्घ श्वास घेतात व हळूच विचारतात, ‘तुमची ती ५२ची यादी’ हे वाक्य ऐकताच दादांचा आवाज थोडा चढतो. ‘पुन्हा तोच खेळ करण्यात काही अर्थ नाही हो! आणि नेहमी मीच खलनायक का व्हायचे? फटकळ, स्पष्ट ही विशेषणे एकदाची ठीक पण पाठीत खंजीर खुपसणारा हे नकोच. आमचे साहेब अजूनही त्याची शिक्षा भोगताहेत. त्यापेक्षा काँग्रेसवाले काय करतात बघू.’ इतका वेळ डोकेफोड करूनही काही हाती लागत नाही हे बघून निराश झालेले भाऊ ‘अच्छा ठीक आहे. बघू’ म्हणत फोन बंद करतात व पुढच्या वाढदिवसापर्यंत तरी काहीतरी घडेल या आशेवर शयनगृहाकडे जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:06 am

Web Title: whatsapp call remembering the morning against congress akp 94
Next Stories
1 सरकारच खरे!
2 बाहुबली-भाग ३
3 गुप्तवार्ता !
Just Now!
X