04 July 2020

News Flash

फलाटावरचे ‘अच्छे दिन’!

घरात भांडी वाजू लागली आणि अंथरुणावरूनच मोरूने घडय़ाळाकडे पाहिलं.

प्रातिनिधिक छायाचित्र

घरात भांडी वाजू लागली आणि अंथरुणावरूनच मोरूने घडय़ाळाकडे पाहिलं. दिवस चांगलाच वर आला होता. मोरू ताडकन बिछान्यावरून उठला. त्याने उशीजवळचा मोबाइल उचलून व्हॉट्सअ‍ॅप उघडले. पण नेटवर्कच नव्हते. ‘वायफाय’ तर सुरू होते. मोरूचे वडील बाजूलाच शांतपणे पेपर वाचत होते. वडिलांनी वायफायचा ‘पासवर्ड’ बदललाय हे मोरूच्या लक्षात आले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गुडमॉर्निग मेसेजेस, व्हिडीओ पडले असतील, मित्रांच्या गप्पा तर कधीच सुरू झाल्या असतील. मित्र आपल्याला शिव्या देत असणार हे लक्षात येताच मोरूने मोबाइल उचलला आणि अंगावर शर्ट चढवून बटणं न लावताच चप्पल घालून झंझावातासारखा घराबाहेर पडला. एकवार पाठमोऱ्या मोरूकडे आणि किचनमध्ये मोरूच्या आईकडे पाहात बापाने लांबलचक सुस्कारा टाकला. तोवर मोरू रस्त्यावर पोहोचला होता. एक खचाखच भरलेली बस पकडून मोरू स्टेशनवर पोहोचला आणि फलाटावरच्या कोपऱ्यातली निवांत जागा पाहून मोरूने मोबाइल बाहेर काढला. व्हॉट्सअ‍ॅपवर कितीतरी व्हिडीओ आणि मेसेज येऊन पडले होते. स्टेशनवरच्या ‘फुकटच्या वायफाय’मुळे मोरूचे ‘नेटवर्क’ जणू थुईथुई नाचत होते. आता भरपूर डाटा वापरून घ्यायचा, मनसोक्त गप्पा मारायच्या, दोन-चार मूव्ही डाऊनलोड करून घ्यायच्या आणि भूक लागल्यावर घरी जायचं, असं ठरवून मोरूने बैठक मारली. रेल्वे स्टेशनवरच्या ‘फुकटच्या वायफाय’वरून फिल्म डाऊनलोड करून घेताना त्याची बोटंही चालत होती. व्हॉट्सअ‍ॅपवरचे मेसेज बघितल्यावर मोरूच्या लक्षात आलं.. आज ‘फादर्स डे’ होता. आपली दखलदेखील न घेता, पेपरात डोकं खुपसून बसलेल्या बापाने वायफायचा पासवर्ड बदलून आपल्याला ‘मोरू’ बनविले हे लक्षात येऊन मोरू चरफडला. त्याच तिरमिरीत त्याने ग्रुप उघडला आणि त्याची बोटे चालू लागली.. ‘बाप म्हणजे बाप असतो, पासवर्ड दिला तर टॉप असतो, नाहीतर डोक्याला ताप असतो.. हॅपी फादर्स डे!’ मेसेज टाइप करून झाल्यावर त्याने तो एकदा वाचला आणि जणू बापाला खुन्नस दिल्याच्या आवेशात त्याने तो ‘सेंड’ करून टाकला.. लगोलग ‘लाइक’चे अंगठे दिसू लागताच मोरू जाम खूश झाला.. म्हणजे, सगळ्याच मित्रांचे बाप आपल्या बापासारखेच असणार.. मोरू आणखीनच जळफळला.. त्याने आसपास पाहिले. त्याच्यासारखे आणखी कितीतरी जण मोबाइलमध्ये डोळे खुपसून काहीतरी पाहण्यात मग्न होते. मोरूचं डोकं भणभणलं. शिक्षण पूर्ण झाल्यावरही नोकरी मिळत नसल्याने वैतागलेल्या मोरूने रेल्वेच्या फुकट वायफायचे आभार मानले. देशात ७५ लाख लोकांनी एकाच महिन्यात याच फुकटच्या वायफायवरून सात हजार टेराबाइट्सपेक्षा जास्त डेटा डाऊनलोड करून घेतल्याची बातमी त्याने मोबाइलवरच एका लिंकवर वाचली होती. बेकारीचे चटके विसरण्याचा एवढा चांगला उपाय देऊन ‘अच्छे दिन’ दाखविल्याबद्दल मोरूने सरकारलाही दुवा दिला. तोवर एक चित्रपट डाऊनलोड झाला होता. आणखी थोडा वेळ थांबून त्याने दुसरी फिल्म डाऊनलोड करून घेतली. दुपार होताच भुकेची जाणीव होऊन मोरू घरी परतला. बापाने पुन्हा मोरूच्या आईला इशारा केला. काहीच न बोलता तिने मोरूसमोर जेवणाचे ताट ठेवले आणि बापही बाजूला बसला. ‘मोरू, काहीतरी कामधंदा कर रे’.. बापाने काकुळतीने मोरूला विनविले. ‘म्हणजे काय होईल?’ मोरूने तोंडातला घास जोरात चावत विचारलं. ‘म्हणजे चार पैसे हाताशी येतील, मग तू तुला आवडणारे चित्रपट पाहू शकशील..’ बापाने ‘युक्तिवाद’ केला आणि मोरू खदाखदा हसू लागला.. ‘मग आत्ता मी काय करतोय?’..  बापाच्या डोळ्यात डोळे भिडवून मोरूने विचारले आणि मान खाली घालून मोरूचा बाप शांत बसला..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2018 3:20 am

Web Title: whatsapp wifi
Next Stories
1 पाऊलखुणा..
2 चला, होऊ या स्वातंत्र्यसैनिक!
3 दिवस सुगीचे सुरू जाहले..
Just Now!
X