तुम्हाला मोबाइलवर चित्रपट बघायला, ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर गप्पा मारायला आवडते? तुम्ही यासाठी मुद्दाम वेळ काढू शकता?.. या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल आणि तुम्ही मुंबईकर असाल, तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकांचा सध्या कायापालट सुरू आहे, हे तुम्ही पाहताच! तुमच्या मोबाइलप्रेमाला नवे धुमारे फुटावेत, असेही काही तरी तेथे आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे ‘स्मार्टफोन’ असला पाहिजे आणि तो वापरण्यासाठी भरपूर वेळ काढण्याची तयारी पाहिजे. मग एखाद्या निवडक रेल्वे स्थानकावर जा, एखादा निवांत कोपरा पकडा आणि स्थानकावरील ‘मोफत वायफाय’ सुविधेचा मनसोक्त वापर करा, मोबाइलवर चित्रपट ‘डाऊनलोड’ करून तो पाहण्याचा आनंद उपभोगा, मित्रमैत्रिणींशी भरपूर चॅटिंग करा, इंटरनेटवर सर्फिग करा.. तुम्ही फक्त वेळ काढा, तो सत्कारणी लावण्यासाठी रेल्वे स्थानकावरच्या ‘वायफाय’ सुविधा तत्पर आहेत! पण आता ही बातमी नवी राहिलेली नाही. अनेकांना तर, फलाटावर उतरताच ‘वायफाय’चा सुगावा लागतो आणि बघताबघता चेहरे खुलू लागतात. पावले निवांत जागेकडे वळतात आणि इच्छापूर्तीचा शोध सुरू होतो. मग आसपासच्या गर्दीचेही भान राहत नाही. मोफत वायफाय सुविधेमुळे अनेक रेल्वे स्थानकांवरच्या निवांत कोपऱ्यांमध्ये अनेक ‘मोबाइलमग्न’ घोळके दिसत असले, तरी ‘ते असे का’ हा प्रश्न पडतच नाही. उलट, असे घोळके हाच या स्थानकावरील मोफत वायफाय सुविधेचा ‘सिग्नल’ असतो. असे कित्येक तास ‘मग्नावस्थेत’ गेले, की मग मात्र चुळबुळ सुरू होते. बराच वेळ एकाच जागी थांबल्याने शरीरातील काही संस्थांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. त्या सक्रिय होतात. ‘मोफत वायफाय’च्या भूलभुलैयातून भानावर आल्यावर याची जाणीव होऊ लागते. तसेही, आपण किती वेळ ‘कळ’ काढू शकतो, याचा प्रत्येकाला अंदाज असतो. वायफायच्या नादात लागलेले मोबाइलध्यान भंग पावते आणि मग शोध सुरू होतो, ‘मोकळेपणा’च्या जागेचा.. ‘निवांत’ वाटणे आणि ‘मोकळे’ वाटणे यातील अंतर या क्षणाला जाणवू लागते. ‘निवांत’ क्षणी ‘मोकळे’ होण्याची निकड तीव्र होते, पण तेथे तर रांग लागलेली असते. आता अधिक ‘कळ काढणे’ शक्य नाही, या विचाराने वेदना वाढू लागतात आणि तसेच पुढे पुढे सरकत मोकळेपणा देणाऱ्या त्या दरवाजाशी पोहोचल्यावर, स्टुलावरच्या पेटीवरून एक तळवा समोर प्रकट होतो. मग आपला हात खिशात घालावा लागतो. एक रुपया दिला, तरच मोकळे होण्याच्या या मार्गात प्रवेश मिळेल, हे जाणवते आणि ‘फुकटातला निवांतपणा’ कमीत कमी एक रुपयाला पडतो, याची जाणीव होऊन चरफडतच हात खिशात जातो.. रेल्वे स्थानकावरील वायफाय सुविधा मोफत असल्याच्या समजुतीत कधी त्याचा फायदा घ्यायची वेळ आलीच, तर मुतारीसाठी एक रुपया देऊन या ‘मोफत’ सुविधेची ‘किंमत’ मोजावी लागेल, हे माहीत असावे यासाठी हा सारा लेखनप्रपंच!