चि. प्रणव धनावडे याचे कोणास कौतुक नाही? क्रिकेटच्या एकाच डावात नाबाद एक हजार ९ धावा काढायच्या. त्यात पुन्हा १२९ चौकार आणि ५९ षटकार ठोकायचे हे इतिहास रचणेच झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणवने हा विक्रम नोंदविला. तेव्हा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप नाही मारायची तर काय करायचे? मराठी माणूस कोणाचीही स्तुती करण्यात कंजूष असला, तरी हवे तेथे कौतुकाचा वर्षांव करण्यास तो मागेपुढे पाहात नाही. प्रणवच्या बाबतीत सुरू असलेले कौतुकपुराण तर सभेच्या समाजशास्त्रीय नियमानुसारच चालले आहे. सभेत ज्याप्रमाणे एकाने टाळी वाजविली की आजूबाजूचे श्रोतेही तळहात साफ करून घेतात, त्याच प्रमाणे प्रणवच्या कौतुकाबाबतही घडते आहे. हे अर्थातच लोकप्रतिनिधी, राजकारणी, सेलेब्रिटी वगैरे वर्गाबाबत आहे. ऐतिहासिक खेळीमुळे प्रणवभोवती जी प्रभा दाटली, त्यातील चार-दोन किरण आपल्याही अंगावर पडले तर तेवढीच आपली प्रतिमा उजळण्यास साह्य़, या मिषाने त्याला हारतुरे देण्यास धावणारे लोक खास करून या वर्गातूनच येतात. यात पुन्हा माध्यमांची तऱ्हा वेगळीच. त्या ब्रेकिंग न्यूजखोरांना खड्डय़ातला प्रिन्स आणि मैदानातला प्रणव सारखेच. त्यांचा स्वार्थ सनसनाटीशी. ती प्रणवच्या विक्रमात साहजिकच होती. तेव्हा माध्यमांनीही त्याला डोक्यावर उचलून घेतले. आता येथे प्रश्न असा उभा राहील की प्रणवचे कौतुक झाले, तर ते तुम्हांस एवढे का खुपले? तर ते प्रणवच्या काळजीने खुपले. कारण कौतुकाचे बोल अनेकदा हवा भरणाऱ्या पंपासारखे असतात. माणसे फुगतात त्याने. लहान वयात तर गळ्यातल्या चार-दोन हारांचाही भार प्रचंड मोठा असतो. मुले त्याखाली दबून जातात. अंबती रायडूसारख्या १९ वर्षांखालील स्पर्धेत तुफान गाजलेल्या क्रिकेटपटूचे पुढे काय झाले ते क्रिकेटरसिकांना आज आठवतही नसेल. प्रणवचे तसे होऊ नये. खुद्द सचिननेही त्याला ही जाणीव करून दिली आहेच. त्याला आणखी यशोशिखरे पादाक्रांत करायची आहेत, हे त्याने आवर्जून सांगितले आहे. त्याचा गर्भितार्थ कळण्याची हुशारी प्रणवमध्ये नसेल कदाचित, पण त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव करणाऱ्या जाणत्यांनी तरी आपल्या कौतुकश्रीमंतीचे अतिप्रदर्शन करू नये. अशा बाबतीत एक हातचा राखावाच. तेच प्रणवच्या भल्याचे असेल. राहता राहिला प्रश्न त्याच्या विक्रमाच्या दर्जाचा. प्रणवने हजार धावा काढल्याचे ऐकूनच अनेकांची दमछाक झाली असणे स्वाभाविक आहे. त्यातूनच समोरचा संघ हलका होता, मैदान लहान होते अशी कुजबुज होताना दिसते, पण त्यात काही अर्थ नाही. तसे होते, तर मग प्रणवच्या ऐवजी आणखी कोणाला का तसा विक्रम करता आला नाही? तेव्हा प्रणवची खेळी, त्यातील त्याची हुशारी याबद्दल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीच पाहिजे. फक्त ती उत्तेजनार्थ असावी. पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाएवढी नसावी. ते प्राप्त करण्यासाठी प्रणवला अजून खूप खूप खेळायचे आहे.