X

सण एक पुरे प्रेमाचा..

अर्थव्यवस्थेस गती देणारा दिवस म्हणून या सणाचे नाव नोंदले गेले.

एखाद्या सकाळी जाग येताच कुठे तरी लांबवर लाऊडस्पीकरवर सुरू असलेले, लहानपणापासून कानावर पडणाऱ्या व गुळगुळीत झालेल्या एखाद्या गाण्याचे सूर कानात घुसावेत आणि त्या सुरावटीवरून आपल्याला त्या दिवसाचे ‘दिनविशेष’ माहीत व्हावे यात आता काही नवे नाही. रविवारी रक्षाबंधनाच्या सणालाही अनेकांचे असेच काहीसे झाले असेल. प्रथा-परंपरा म्हणून नव्हे, तर प्रसिद्धी आणि पैशाचा सण म्हणूनही रक्षाबंधनास वेठीस धरण्याच्या कल्पकतेचे कौतुक केले पाहिजे. बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या परंपरेला बघता बघता राजकीय रंग चढले आणि लाखोंच्या आर्थिक उलाढालीसही एक नवा मुहूर्त लाभला. अर्थव्यवस्थेस गती देणारा दिवस म्हणून या सणाचे नाव नोंदले गेले. परिवर्तनाचे असेच असते. ती एक संथ परंतु शाश्वत प्रक्रिया असते. ती आपल्या अगदी समोर घडत असली, तरी ती जाणवत नाही. रक्षाबंधनाच्या सणाला परिवर्तनाचे वारे नेमके कधी शिवले हे सांगता येणार नसले, तरी थोडे मागे पाहिले तर परिवर्तनाचे टप्पे सहज स्पष्ट होऊ लागतात आणि आता हा केवळ सण राहिलेलाच नाही, हे लक्षात येते. महिलांची सुरक्षितता हा संवेदनशील आणि ऐरणीवरील मुद्दा कधी बनला ते शोधण्यासाठी जितके मागे जाता येईल, तेवढेच मागे गेल्यास रक्षाबंधनाच्या परिवर्तनाच्या पायऱ्यांचा परिचय होऊ लागतो आणि या सणाचे राजकीयीकरण करणाऱ्यांचे कौतुक करावे की सण हरवल्याने खंतावून जावे हेच कळेनासे होते. भारतातील सर्वात मोठा रक्षाबंधनाचा उत्सव आमदार राम कदम यांनी गेल्या वर्षी साजरा केला, तेव्हाही अनेकांचे असेच काहीसे झाले होते. साठ हजार बहिणींचा भाऊ म्हणून गिनीज बुकात नोंद झालेला आमदार कदमांचा विक्रम अजून तरी कोणास मोडता आला नसला, तरी चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी यंदा त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली हे कौतुकास्पद आहे. राम कदमांच्या मनगटावर गेल्या वर्षी चार दिवसांत साठ हजार राख्या बांधल्या गेल्या होत्या, तर प्रदीप शर्मा यांच्या मनगटावर एकाच दिवशी बारा हजार बहिणींनी राख्या बांधल्या. राख्यांच्या ओझ्याने अवजडलेली मनगटे उचलून नमस्काराच्या पवित्र्यातील प्रदीप शर्मा यांचा तो फोटो समाजमाध्यमांवर एवढा पसरला, की रक्षाबंधनाच्या या सणालाही आपले सार्थक झाल्यासारखे वाटू लागले असेल. रक्षाबंधनाच्या विक्रमाची अशी स्पर्धा सर्वत्र साजरी झाली पाहिजे. त्याचे अनेक फायदे संभवतात. मुख्य म्हणजे, राख्यांची घाऊक खरेदी केली जाऊन या व्यवसायातील गरीब हातांना या सणाच्या निमित्ताने काम मिळते आणि अर्थव्यवस्थेस तेजी येते. रक्षाबंधनाच्या रविवारी ज्यांनी घराबाहेर  पडण्याचे धाडस केले असेल, त्यांना या सणाचे नवे रूप नक्कीच जाणवले असेल. सुट्टीच्या दिवशीही वाहनांनी तुडुंब वाहणारे रस्ते, खचाखच भरलेल्या रेल्वेगाडय़ा आणि दुकानांमध्ये सुरू झालेली खरेदीची रेलचेल, हे सारे काय दर्शविते? परंपरावादाला झालेला नवतेचा हा अनोखा स्पर्श भविष्यात अधिकाधिक गडद होत गेला, तर रक्षाबंधन हा एका दिवसाचा सण राहणार नाही, तर उत्सवाचा सप्ताह साजरा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उतरलेली असेल! कालबाह्य़ होणाऱ्या प्रथा, परंपरांना असा नवतेचा साज चढवून त्याचे आधुनिकीकरण करण्याची प्रेरणा जोवर जिवंत आहे, तोवर कोणत्याही सणाला अंत  नाही. ‘फ्रेंडशिप डे’ला साध्या रबरबंदालाही बाजारपेठेत भाव मिळतो, तसा भाव                  राखीला मिळेल तेव्हा हा दिवस आणखी तेजस्वी होईल. तो भविष्यकाळ आता फार दूर नाही..