X

क्षणाची आयेषा..

हे वरील विवेचन कुणाला कळणार नाही, कुणाला अगम्य वाटेल, कुणाला दुबरेध भासेल..

काँग्रेसचे (सध्या मानसरोवर यात्रेसाठी चीनच्या हद्दीत असलेले) अध्यक्ष राहुल गांधी यांना रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण ही भले वावडीच ठरली असेल, पण काँग्रेससुद्धा आमचीच हे संघाने अखेर जगाला दाखवून दिले आहे. अमेरिकेत, जेथे १२५ वर्षांपूर्वी सर्वधर्म परिषद भरली होती त्या शिकागो शहरात परवा ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’ भरवून संघाने काँग्रेसवर हिंदुत्वाचा झेंडा रोवला. कुणी म्हणेल, शिकागोतल्या या काँग्रेसशी संघाचा काही संबंध नाही. पण संबंध आहे की नाही हा मुद्दाच कधी होता? आणि कशाचा संबंध कशाशी जोडायचा याचे तारतम्य बाळगत बसलो तर एकजूट कशी होणार? संबंध असो वा नसो, आपण आपला प्रचार करीत राहावे. तरच मोहनजी भागवत यांच्या स्वप्नातली एकजूट प्रत्यक्षात येईल. मग प्रचाराशी कशाचा संबंध असायला हवा याचाही विचार कशाला करायला हवा?

हे वरील विवेचन कुणाला कळणार नाही, कुणाला अगम्य वाटेल, कुणाला दुबरेध भासेल.. तर त्यांच्यासाठी याच काँग्रेसमधले एक उदाहरण घेऊ या. शर्मिला टागोर आणि नवाब मन्सूर अली खान पतौडी यांचा १९६९ मध्ये झालेला विवाह हा ‘लव्ह जिहाद’ होता, शर्मिलाचे नाव लग्नानंतर ‘आयेषा बेगम सुल्ताना’ झाले, असा प्रचार शिकागोच्या काँग्रेसमध्ये झाल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आहेत. याचा शिकागोतल्या वर्ल्ड हिंदू काँग्रेसशी काय संबंध असे जे विचारतील, त्यांना एकजुटीचे महत्त्वच कळलेले नाही असे खुशाल समजावे! लव्ह जिहाद हा संघाचा मुद्दा नव्हे, याची आठवण जे देतील, त्यांचे प्रचारभान कमी पडते, याची खूणगाठही तितकीच खुशाल बांधावी. भले नसेल संबंध. म्हणजे, संघाचा लव्ह जिहादशी संबंध नसेल, संघाचा शिकागोच्या काँग्रेसशी संबंध नसेल, संघाचा त्या काँग्रेसबद्दलच्या बातम्यांशी संबंध नसेल.. समजा नाहीच काही संबंध. काय फरक पडतो? शिवाय ‘संघाच्या कार्यक्रमात (म्हणजे शिकागोच्या काँग्रेसमध्ये) शर्मिला-पतौडीच्या ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा’ या बातमीशी समजा त्या कार्यक्रमाचा काही म्हणता काहीही संबंध नसेल. समजा नाहीच. तरीही काय फरक पडतो? समजा प्रसारमाध्यमांपैकी काहींनी हा मथळा दिला नसता, तर नुसत्या भाषणांच्या- त्यातल्या त्या प्रतिपादनांच्या वगैरे बातम्या आजकाल कुणी पाहाते-वाचते का?

‘लव्ह जिहाद’ ही गोष्टच अशी आहे, की काही संबंध नसला तरी त्यावर बोलता येतेच.. ‘धर्मेद्र- हेमामालिनी यांनी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता- दिलावर खान आणि आयेषा अशी नावे घेऊन त्यांनी निकाल केला. हा पाहा त्यांचा निकाहनामा’ अशी कागदपत्रे कुठल्याशा न्यायालयात सादर करून काँग्रेसच्या (म्हणजे राहुल गांधी ज्याचे अध्यक्ष आहेत त्या पक्षाच्या) राजस्थानातील दोघा स्थानिक नेत्यांनी २००४ साली (म्हणजे राहुल गांधी अध्यक्ष नव्हते तेव्हा) खळबळ उडवून दिली होती.. तेव्हा तरी कुठे होता काही संबंध? हेमा मालिनी काय किंवा शर्मिला टागोर काय, क्षणाच्या आयेषा आणि अनंतकाळच्या अभिनेत्रीच.

पण ‘शर्मिला-पतौडी लव्ह जिहाद’ या एका बातमीने किती काम केले पाहा. ज्यांनी तशा बातम्या दिलेल्या नाहीत, त्यांना  हिंदूहितविरोधी ठरवणे सोपे झाले. ज्यांनी या मथळय़ासाठी पुढली बातमी वाचली वा पाहिली, त्यांना सरसंघचालकांचे भाषण वाचता आले. भाषण ज्यांनी वाचले, ते आता एकजुटीसाठी सज्ज होणारच!