22 February 2019

News Flash

एक अस्वस्थ ‘राष्ट्रमंच’!

कलाकार स्वत:ला नायकाच्या भूमिकेत पाहात असतो.

शत्रुघ्न सिन्हा

राजकारणाच्या विशाल रंगमंचावरील प्रत्येक कलाकार स्वत:ला नायकाच्या भूमिकेत पाहात असतो. त्यामुळे अडगळीतले नेतेदेखील या मंचावरच्या झगमगीत झोतात राहण्यासाठी आसुसलेले असतात. या झोताची एखादी तिरीप अंगावर पडेल अशा आशेने तो मंचावर वावरत असतो; पण बऱ्याचदा त्याच्या भूमिकेस कथानकात वावच नसल्याने कलाकार अंधारातच राहतो. अशा वेळी त्याची तगमग होते, अस्वस्थता येते आणि मंचावरच्या एका कोपऱ्यावर आपला स्वत:चा मंच सजवून तो तेथे आपले कथानक मांडतो. अगोदर कधीकाळी कुठल्या तरी मंचावरील एखादी भूमिका बऱ्यापैकी वठलेली असल्याने, आताची उपेक्षा त्याला टोचू लागते आणि आपल्यापुरत्या मंचावर आपल्यापुरता प्रकाशझोत अंगावर घेऊन त्यात उजळून निघण्याचा प्रयत्न तो करू पाहतो. त्याच वेळी मुख्य मंचावर एखादे मुख्य कथानक अतिशय रंगात येत असताना आणि प्रत्येक प्रमुख कलाकाराच्या अभिनयगुणांनी भारावून अवघा प्रेक्षकवृंद मुख्य कथानकात मग्न असताना अचानक कोपऱ्यावर उजेडाचा कवडसा कुठून आला या जाणिवेने क्षणभरच प्रेक्षकाची चलबिचल होते, नजरा कोपऱ्यात वळतात आणि त्याच क्षणी हा अस्वस्थ कलाकार खूश होतो. आता आपलेच कथानक आणि आपणच नायक अशा थाटात तो आपली भूमिका वठवू लागतो; पण पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष मूळ कथानकाकडे वळते. मग हा कलाकार कोपऱ्यावर थेट अतिक्रमण करतो आणि तेथे आपल्या नाटकाचा पसारा मांडतो. या उपकथानकातील कलाकाराची कारकीर्दही उतरणीला लागलेली असते; पण सत्तामंचावर चळवळीचे एक नवे अंग उदयाला येणार असे राजकीय नाटय़निरीक्षकांना उगीचच वाटू लागते.   सध्याच्या राजकीय मंचावरील भाजपीय सत्तानाटय़ात सारे प्रेक्षक रंगून गेलेले असताना एका उपकथानकामुळे अचानक आपला कोपरा असाच उजळून घेतला. या उपनाटय़ात सध्या यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या नावाची दोनच पात्रे आहेत. एका पात्राला पडद्यावरच्या अभिनयाचा दांडगा अनुभव आहे; तर दुसऱ्या पात्राने कधीकाळी एका मुख्य राजकीय कथानकात काहीशी बरी भूमिका वठवलीदेखील आहे. तो रंगमंच, ते सहकलाकार आणि ते कथानक आज राहिलेले नाही, याची खंत करत दररोज नवे उसासे टाकणे हा त्यांच्या नवकथानकातील अभिनयाचा मुख्य भाग! राजकीय मंचावरील आपल्या कोपऱ्याचे या दोघा पात्रांनी (पक्षी- कलाकारांनी) नामकरण केले. या आपल्यापुरत्या मंचाला त्यांनी ‘राष्ट्रमंच’ असे नाव दिले. या मंचावरून कोणते कथानक सादर करावयाचे याची पुसटशी कल्पनाही त्यांनी माध्यमांना दिली. त्यावरून, ‘मेरी आवाज सुनो’, ‘तो काळ आता उरला नाही’ किंवा ‘कहाँ गये वो लोग’ असे काही तरी या अस्वस्थ उपकथानकाचे नाव असणार असा अंदाज करता येऊ  शकतो. या ‘कोपरा नाटय़ा’त नव्या, होतकरू किंवा उपेक्षित कलाकारांचे स्वागत आहे, असेही त्यांनी जाहीर करून टाकले आहे. म्हणजे, राजकीय नाटय़मंच व्यापण्याचे त्यांचे स्वप्न आहे; पण या मंचावर मुख्य कथानकाचा नायक कुणालाच शिरकाव करू देत नाही. म्हणूनच, अस्वस्थ राष्ट्रमंचावरील नवप्रयोगाकडे प्रेक्षकांचे लक्ष जाणार की नाही याची नाटय़निरीक्षकांना आता उत्सुकता आहे..

First Published on February 1, 2018 1:42 am

Web Title: yashwant sinha and shatrughan sinha