देशात किती तरी कोटी रोजगार निर्माण करण्याची जी भीष्मप्रतिज्ञा महामहीम प्रधानसेवकांनी केली आहे तिची आठवण वारंवार करून देण्याचे विरोधकांना काहीही कारण नाही. कारण की गेल्या साठ (किंवा सत्तरही असेल!) वर्षांत त्यांनी एकसुद्धा रोजगार येथे निर्माण केलेला नाही; परंतु आम्हाला त्या नतद्रष्ट विरोधकांना सांगावेसे वाटते, की नि:पक्षपातीपणे व सकारात्मक पद्धतीने म्हणजे आमच्याच प्रमाणे विचार करा आणि पाहा, तुम्हाला नक्कीच दृष्टांत होतील की या कौशल्यांकित भारतात रोजगारनिर्मितीचे कार्य मोठय़ा जोमाने सुरू आहे. आता ही नवी योजनाच पाहा. त्याअंतर्गत बुलडोझरचालक असे एक नवे रोजगार क्षेत्र निर्माण केले जात आहे. आपल्या विविध नेत्यांनी अत्यंत कल्पकतेने त्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचा शुभारंभ केला तो अर्थातच आपले लाडके नेते नितीनजी गडकरी यांनी. ठेकेदारांनी रस्तेबांधणीचे काम नीट केले नाही, तर त्यांना बुलडोझरखाली घालण्याची नवी कल्पक योजना आखली. त्यामुळे गावोगावी प्रत्येक रस्त्याच्या कामावर कंत्राटदारांचे बुलडोझर आणि बाजूला कंत्राटदारांवर घालावयाचे बुलडोझर दिसू लागले आहेत. त्यातून आपसूकच बुलडोझरचालकांसाठी रोजगारसंधी निर्माण झाली. आता याच योजनेच्या पुढच्या भागाचा शुभारंभ उत्तम (!) प्रदेशात होणार आहे. त्याचे सूतोवाच नुकतेच उत्तम प्रदेशाचे मुख्यमंत्री योगीराज आदित्यनाथ यांनी केले. तूर्तास प्रायोगिक तत्त्वावर ती उत्तम प्रदेशात लागू होईल. हळूहळू म्हणजे २०१९ नंतर संपूर्ण देशातच ती लागू केली जाईल. उत्तम प्रदेशातील माता आणि भगिनी यांच्या रक्षणासाठी याआधी योगीजींची सेना कार्यरत होतीच. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला. ती योजना कमालीची यशस्वी झाली व त्यातून माता-भगिनींना कमालीची सुरक्षितता मिळाली. त्यामुळे आता पुन्हा माता-भगिनींच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री बुलडोझर चलन योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार माता-भगिनींवर वाईट नजर टाकणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात येणार आहेत. यात अनेकविध पातळ्यांवर रोजगारनिर्मितीची क्षमता आहे हे नतद्रष्ट विरोधकांच्या लक्षात येणार नाहीच; परंतु यातून एक तर बुलडोझर व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर वाढ होईल, शिवाय नजर दृष्टी पथकाचीही स्थापना करावी लागेल. कोण कोणावर वाईट नजर ठेवतोय हे हुडकून काढण्यासाठी हे पथक फिरते राहील. किती तरी बेरोजगारांच्या हातांना आणि डोळ्यांना यातून काम मिळेल. बुलडोझरांची मागणी वाढेल. त्यांचे कारखाने काढावे लागतील. या पथदर्शी प्रकल्पात सध्या तरी अडचण एकच आहे. ते म्हणजे गडकरींनी गेल्याच महिन्यात पुण्यातून घोषणा केली, की मी बुलडोझर आहे. तसे असेल, तर मग घरांवरून फिरवायचे कुणाला? योगी आदित्यनाथ यांनी ही ‘क्वेरी’ केंद्राकडे पाठविली आहे म्हणतात..