करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्याचे विविध उपाय सोशल मीडियावर सांगितले जात आहेत. काही उपाय अगदी योग्य आहेत तर काही निव्वळ अफवा. याच दरम्यान अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. खरं तर अमिताभ नेहमीच आपल्या मनातील विचार ट्विटच्या माध्यमातून मांडत असतात. मात्र या ट्विटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कारण यामध्ये त्यांनी करोनाचा संबंध थेट ज्योतिष विद्येशी जोडला होता. मात्र नेटकऱ्यांच्या टीकेचा भडीमार सुरु होताच त्यांनी हे ट्विट डिलिट केले.

काय लिहिले होते या ट्विटमध्ये?

“एक मत: संध्याकाळी पाच वाजता, २२ मार्च रोजी अमावस्या होती. यादिवशी व्हायरस, बॅक्टेरिया यांसारख्या दुष्ट शक्तींना जास्त सामर्थ्य मिळतं. अशा वेळी शंखनाद केल्यास विषाणूंची क्षमता कमी किंवा नष्ट होते. चंद्र ‘रेवती’ या नवीन नक्षत्रात प्रवेश करत आहे. सर्वांनी मिळून शंखनाद केल्यास रक्ताभिसरण चांगले होते”, असं ट्विट बिग बींनी केले होते.

बिग बींच्या या ट्विटवर स्टँडअप कॉमेडिअन वरुन ग्रोवर, डॉ. कुमार विश्वास यांसारख्या अनेकांनी टीका केली. अंधश्रद्धा पसरवू नका असा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यामुळे वाढता विरोध लक्षात घेऊन अखेर बिग बींनी हे ट्विट डिलिट केले.