बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते वृद्ध महिलेसोबत गप्पा मारताना दिसतात. अनुपम यांनी कालच शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ८३ हजारांपेक्षाही अधिक नेटिझन्सनी पाहिले असून त्यावर आठशेपेक्षाही अधिक कमेन्ट्स आल्या आहेत. तसेच अनुपम यांनी व्हिडिओला कॅप्शनमध्ये भारतीय महिला (#WomanOfIndia), आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन (#AttitudeTowardsLife) हे हॅशटॅग्स दिले आहेत.

या व्हिडिओत अनुपम खेर वृद्ध महिलेला काही प्रश्न विचारत त्यांची छोटीशी पण रंजक अशी मुलाखत घेतल्याचे पाहावयास मिळते. तुमचे नाव काय? असा पहिला प्रश्न अनुपम यांनी महिलेस केल्यावर त्यांनी अनमोवा असे त्यांचे नाव असल्याचे सांगितले. तुमचं वय किती आहे? असं विचारल्यावर त्या हसत मला माहिती नाही असे म्हणाल्या. त्यांना हसताना पाहून अनुपम यांनाही त्यांचे हसू अनावर झाल्याचे यात दिसते. तुम्ही कुठे राहणा-या आहात? असा प्रश्न केल्यावर देव जेव्हा मला बोलावेल तेव्हा मी त्याच्याकडे जाईन असे उत्तर त्या महिलेने दिले. यावर अनुपम त्यांना म्हणाले की, इतक्यात कुठे…. तुम्ही अजून खूप जगाल.

जवळपास ८५ वर्षाच्या असलेल्या या वृद्ध महिला अनुपम यांच्या ऑफिसमध्ये काम करतात. व्हिडिओत ज्या आपुलकीने अनुपम महिलेला मिठी मारतात ते खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही मला ओळखता का? असा प्रश्न अनुपम यांनी महिलेस केला. त्यावर होय, असे उत्तर देत त्या म्हणाल्या की, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता तेथेच मीदेखील काम करते. अनुपम आणि वृद्ध महिलेमधील संभाषणाच्या व्हिडिओला नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अनुमप यांच्या व्हिडिओची प्रशंसा केली आहे तर काहींनी त्याची निंदा केली आहे. तुम्ही त्या महिलेस वृद्धाश्रमात सोडले असते तर बरे झाले असते, असे काही नेटिझन्सनी म्हटले आहे. राव रॉबी या नेटिझननी लिहिलेय की, सर मी तुमची माफी मागतो. पण, या वृद्ध महिलेस तुमच्या ऑफिसमध्ये कामाला ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेले असते तर जास्त चांगलं झालं असतं. त्या आजींच वय झालं आहे. त्यांना वृद्धाश्रमात ठेवून निदान तुम्ही त्यांचा खर्च उचलू शकता. पुढे या युजरने अनुपम यांची प्रशंसादेखील केली. त्याने लिहिले की, एक सेलिब्रिटी असूनही तुम्ही या महिलेसोबत संवाद साधलात ही खूप छान बाब आहे.