ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवलेल्या इंग्लंडने रविवारी दुसरा सामना जिंकत मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद १५७ धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने सलामीला येत नाबाद ७७ धावा ठोकल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जोस बटलरने संपूर्ण डाव खेळून काढत दमदार खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

सहसा पाचव्या-सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या जोस बटलरला इंग्लंडने सलामीवीर म्हणून संधी दिली आणि त्याचं त्याने सोनं केलं. ५४ चेंडूत त्याने नाबाद ७७ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. IPLमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना बटलर सलामीलाच खेळत होता आणि त्यातही त्याने चांगली कामगिरी केली होती. कधीही विजेतेपद न मिळवू शकलेल्या RCB संघाच्या चाहत्याने राजस्थानला एक सवाल केला. “मी असं काय करू की तुम्ही जोस बटलरला RCBकडे सुपूर्द कराल?”, असा त्याने प्रश्न केला.

त्यावर राजस्थानने भन्नाट रिप्लाय दिला. “मी तुझी कोणतीही मदत करू शकत नाही. तुला हवं तर तू खेळ सोडून जाऊ शकतोस”, असं सांगणारा अमिताभ यांचा एक फोटो त्यांनी पोस्ट केला. या ओळी प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ अनेक वेळा वापरतात. त्याच शो मधील फोटो पोस्ट करून त्यांनी चाहत्याला भन्नाट रिप्लाय दिला.

दरम्यान, सध्या सर्व संघ हे कसून तयारी करत आहेत. काही परदेशी खेळाडू अद्याप युएईमध्ये दाखल झालेले नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये टी२० मालिका सुरू आहे. त्यातील पहिला आणि दुसरा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत २-०ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना खेळून झाल्यावर त्यापैकी काही खेळाडू हे IPLसाठी दुबईला रवाना होणार आहेत.