रहस्यमय चित्रपटाचे सर्वात मोठे यश कशात माहित्येय? त्याच्या नावात..
‘तलाश’ म्हणताक्षणीच हा रहस्यरंजक चित्रपट आहे ही ‘ओळख’ पटते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, चित्रपटाचे नाव त्याची पहिली ओळख असते. तशी ओळख होताच ‘या चित्रपटात आपल्याला काय पाह्य़ला मिळणार आहे’ या दिशा व अपेक्षेने आपण चित्रपटाकडे जातो..
बी. आर. चोप्रांचे ‘कानून’ व ‘हमराज’, विजय आनंदचे ‘ज्वेल थीप’ व ‘तिसरी मंझिल’, राज खोसलांचे ‘वह कौन थी’ व ‘मेरा साया’, यश चोप्रांचा ‘इत्तेफाक’, रवि  टंडनचे  ‘अनहोनी’ व ‘अपने रंग हजार’, हृषीकेश मुखर्जीचा ‘बुढ्ढा मिल गया’, राजा नवाथेंचा ‘गुमनाम’ हे आपल्याकडचे सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट होत. एव्हाना रसिकांची एक पिढी साठ-सत्तरच्या दशकांत पोहचली असेल..
या पठडीतील चित्रपटांची आणखी महत्त्वाची नावे सांगायची तर धुंद, द ट्रेन, सजा, और कौन, खोज, परवाना, परदे के पीछे, काली घटा, बुलेट, गुप्त, फर्ज, सुरक्षा, सी.आय.डी., रात अंधेरी थी, कश्मकश, शक, शालीमार, हमराज, खेल खेल में, गहरी चाल, फिर वही रात..
बरेचसे रहस्यपट ‘एका खुना’भोवती  गडद होत जात (आता पहिल्या दृश्यापासून सिनेमात किती खून पडतात याची गणती मुश्कील होते, तरी रहस्याचा चकमा तो नाही), अथवा हिऱ्याच्या चोरीभोवती रहस्याची घट्ट वीण असे. बुद्धीला खाद्य देण्याची सर्वाधिक हुशारी याच चित्रपटात असते, सतत आपले ‘हा की तो’, ‘बहुधा तो असावा’ असा चकमा देणारा ‘तो’च सर्वोत्तम रहस्यपट. जोडीला कधी रहस्याची गूढता वाढवणारे, तर कधी यातला तणाव कमी करणारे असे श्रवणीय गीत, संगीत व अगदी पाश्र्वसंगीतही. प्रेक्षकांचे लक्ष पडद्यावर खिळून राहील. मध्यंतरला त्याला चकमा मिळेल व शेवटी ‘खरा खुनी वा चोर’ समजल्यावर अविश्वास वाटेल तो यशस्वी रहस्यपट समजावा व असा चित्रपट अनुभवल्यावर त्याचे रहस्य स्वत:पाशी जपून ठेवणारा तो खरा चित्रपट रसिक ठरावा.
बऱ्याचशा रहस्यपटांच्या जाहिरातीत ‘सुरुवात चुकवू नका व शेवट कोणाला सांगू नका’ असे सांगण्यामागचा हेतू चांगला असतो. तरी काही उत्साही रसिक, अरे कालच मी ‘धुंद’ पाहिला, शेवटपर्यंत लक्षात येत नाही की त्यात नवीन निश्चल खुनी आहे ते, असे सांगून टाकतात.  अरेरे.
एकदा रहस्य माहीत पडूनही पूर्वीचे रहस्यपट गीत-संगीतासाठी पुन्हा पाहिले जात. बऱ्याचदा मॅटिनी शोला ते पुन:पुन्हा पाहिले जात. आपल्या सिनेमा संस्कृतीची खासियत केवढी.
नंतरच्या पिढीत ‘खिलाडी’पासून अब्बास-मुश्तान ‘रहस्यपटाचे जादुगार’ म्हणून ओळखले गेले. पण त्यांच्या ‘खिलाडी’ची कल्पना ‘खेल खेल मे’वर बेतली होती. ते लपवण्याचे रहस्य त्यांना जमायला हवे होते. ‘प्लेअर्स’मध्ये मध्यंतरालाच त्यांनी रहस्याची उकल केल्यावर पुढच्या सिनेमात रस तो काय राहिला? विदेशी चित्रपटावरून डल्ला मारताना त्याचे हिंदीतील पारंपरिक लोकप्रिय चित्रपटात रूपांतर करताना पथ्य पाळावी लागतात. कलाकारांच्या इमेजशी खेळावे लागते (‘ज्वेल थीप’चे रहस्य आठवा), रसिकांचे समज-गैरसमज वापरावे लागतात (‘खेल खेल मे’चे यश त्यातच होते), प्रेक्षकांच्या समजशक्तीवर विश्वास दाखवतानाच त्यांचा गोंधळही उडायला हवा  (दुलाल गुहाचा ‘धुआँ’ बघा).
‘तलाश’ अशाच अस्सल रहस्यरंजक चित्रपटाचे युग परत आणेल का ? ‘खान’दानी हीरोंनी तशा चित्रपटाकडे अधिक वळावे. ‘एक था टायगर’मध्ये कतरिना नक्की कोण आहे हे रहस्य गडद झाले नाही. रहस्यपट फक्त पडद्यावर सरकत राहणे चांगले लक्षण नव्हे,
त्यात रसिक गुंतत गेला पाहिजे, त्याची आपली पटकथेतील वळणे व
धक्के यानुसार ‘तलाश’ सुरू राह्य़ला हवी.. हाच खरा ‘मेंदू कुरतडणारा सिनेमा’ होय.