IPL 2020 चे वेळापत्रक रविवारी जाहीर झाले. त्यानंतर आता करोनाच्या भीतीमुळे क्रिकेटपासून आणि मैदानापासून दीर्घकाळ लांब राहिलेले सर्व खेळाडू कसून तयारीला लागले आहेत. प्रशिक्षण सत्र आणि व्यायाम यावर भर देत आपली तंदुरूस्ती कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघदेखील जोरदार तयारी करताना दिसत आहे. संघातील खेळाडूंमध्ये समन्वय राहावा आणि तंदुरूस्ती राहावी यासाठी नुकताच RCBच्या क्रिकेटपटूंमध्ये एक फुटबॉल सामना खेळवण्यात आला.

गेल्या ६-७ वर्षांपासून RCBचा संघ फुटबॉल सामन्याने हंगामाची सुरुवात करतो. सर्व खेळाडू पहिल्यांदा जेव्हा एकत्र मैदानावर उतरतात तेव्हा त्यांच्यात फुटबॉल सामना खेळवला जातो. तसाच यंदाही कोहली ‘हॉट डॉग्स’ वि. डीव्हिलियर्स ‘कूल कॅट्स’ असा सामना खेळवला गेला. संघाचे मानसिक आरोग्य प्रशिक्षक असलेले शंकर बसू यांनी पारंपारिक सामन्याबद्दल आणि फुटबॉल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंबद्दल व्हिडीओमधून माहिती दिली. तसेच सामन्यात सामनाधिकारी म्हणून भूमिकाही पार पाडली.

पाहा सामन्याचा व्हिडीओ-

राजस्थान रॉयल्सने केलं RCBला ट्रोल

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विविध संघांनी आपल्या चाहत्यांच्या सोयीसाठी आपले सामने कोणत्या संघासोबत आहेत आणि कोणत्या दिवशी आहेत याचे चार्ट तयार केले. RCBच्या संघाने कल्पकतेने सर्व विरोधी संघांचे लोगो वापरून चाहत्यांना ‘तुमचा आवडता सामना कोणता?’ असा प्रश्न विचारला. याच प्रश्नावर एक रिप्लाय आला तो राजस्थान रॉयल्सचा. RCBने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये राजस्थान संघाचा जुना लोगो वापरण्यात आला होता. त्यावरून राजस्थानने RCBला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. ‘मी राजस्थान रॉयल्स संघाचा योग्य लोगो वापरेन’, असं फळ्यावर खूप वेळा लिहिणारा मुलगा फोटोत दाखवत त्यांनी RCBची खिल्ली उडवली.