नोटाबंदीमुळे येत्या वर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. यावर्षी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ७ टक्के असेल असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. याआधी यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.६% वाढणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. पण आता वाढीचं हे प्रमाण कमी राहणार असल्याचं जागतिक बँकेने स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था ७.१ टक्क्यांनी वाढणार असल्याचं म्हटलं होतं. पण जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्थेची वाढ आणखी कमी दराने होणार आहे.

पण याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सशक्त राहणार असल्याचंही जागतिक बँक म्हणाली आहे. आतापर्यंत भारतामधले ८०% व्यवहार नोटांनी होत असल्याने अचानक झालेल्या या नोटाबंदीने पुढच्या काही काळासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर तसंच घरगुती व्यवहारांवर नोटाबंदीचा परिणाम जाणवेल असं जागतिक बँकेने म्हटलंय.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकार घडवू पाहत असलेल्या आर्थिक सुधारणांवरही नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम यापुढे काही काळ जाणवणार असल्याचं जागतिक बँक म्हणाली. जीएसटी आणि भूसुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीवरही याचा परिणाम होणार आहे.

८ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर बँकांमध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटी २२० अब्ज रूपये जमा झाले असल्याचा अंदाज आहे. यामुळे व्याजदरांमध्ये घट  होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये जाणवलाय. डिसेंबर महिन्यात वाहनखरेदीवरही हा परिणाम दिसून आला. डिसेंबर महिन्यात गेल्या १६ वर्षांतली नीचांकी वाहनखरेदी झालीये. वर्षाच्या शेवटी कारडीलर्सनी अनेक सवलती जाहीर करूनही ग्राहकांनी वाहनखरेदी अतिशय थंडा प्रतिसाद दिलाय.

वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘सिआम’  (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स)ने यासंबंधी माहिती मंगळवारी जाहीर केली आहे.  वाहन उत्पादक संघटनेने सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्री वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार २०१६-१७ मध्ये प्रवासी वाहन विक्री १० ते १२ टक्क्यांनी वाढेल, असे नमूद करण्यात आले होते. यापूर्वीचा या गटातील वाहन विक्रीच्या वाढीचा अंदाज ११ ते १३ टक्के असेल, असे म्हटले होते.