Amitabh Bachchan Health update : बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडल्याचं स्वतः अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरून सांगितलं आहे. अमिताभ बच्चन यांना शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत.
सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नियमित ब्लॉग लिहून त्यांच्या भावना व्यक्त करीत असतात. त्यांचे अनुभव आणि विचार मांडून चाहत्यांशी संवाद साधत असतात. अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट चाहत्यांना विचार करण्यास भाग पाडतात. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक पोस्टला एक खास आकडा दिलेला असतो. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत ६,७२६ ब्लॉग लिहिले आहेत. पण, त्यांच्या आजच्या पोस्टमुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. कारण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.
अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अमिताभ बच्चन यांनी रात्री अडीचच्या सुमारास सोशल मीडियावर पोस्ट करीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे सांगितले आहे. अमिताभ यांनी लिहिलं, “रुग्णालयामध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. आयसीयूमध्ये कुशल डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. यानंतर आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून घरी परत आलो आहे. पण, खरंतर रुग्णालयातून घरी परत आल्यानंतरचा हा काळ सर्वांत कठीण असतो. शारीरिक, मानसिक आणि प्रॅक्टिकली हा टप्पा खूपच आव्हान देणारा आणि अवघड असतो.”
अचानक पराभव तुमच्यासमोर येऊन उभा – अमिताभ बच्चन
पुढे त्यांनी लिहिलं, एक काळ असा असतो, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या नजरेत विजेता असता; पण एक दिवस असा अचानक पराभव तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. आयुष्यातला हा सर्वांत कठीण टप्पा असतो. काही जण अशा परिस्थितीला मोठ्या हिमतीने सामोरे जातात, तर काही जण त्याच्यापुढे हार मानतात. जे जिद्दीने लढतात आणि हिंमत दाखवतात, ते कायम विजयी ठरतात. ज्यांना असं करता येत नाही ते भूतकाळातील यशाच्या आठवणींमध्ये आयुष्य जगत राहतात, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. या दोन्हींपैकी कोणताही मार्ग चुकीचा नाही; निरोगी राहा, आनंदी राहा.”
T 5806 – खेल समाप्त हो गया ! पर काम चल रहा है
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 20, 2026
खेळ संपला आहे पण… – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर मत व्यक्त करत असतात. रविवारी (ता.१९) त्यांनी चाहते त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर भेटायला आल्याची पोस्ट शेअर केली होती. रविवारी त्यांनी उत्साहाने बंगल्याबाहेर चाहत्यांशी संवाद साधला आणि भेट घेतली होती. मात्र, यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालयातील पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांनी ‘खेळ संपला आहे पण काम चालू आहे,’ अशी सूचक पोस्ट केली आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
