भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “काँग्रेस ही राष्ट्रीय, भारतीय किंवा लोकशाहीवादी पक्ष राहिला नसून केवळ भाऊ आणि बहिणीचा पक्ष बनला आहे.” मुंबईत आयोजित घराणेशाहीचा राजकीय पक्षांना धोका या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.


या चर्चासत्रात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, ​​केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे (एआयएडीएमके) एम थंबी दुराई आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

प्रादेशिक पक्षही आता कौटुंबिक पक्षात बदलले
चर्चासत्राचे उद्घाटन केल्यानंतर नड्डा यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), नॅशनल कॉन्फरन्स, शिरोमणी अकाली दल, इंडियन नॅशनल लोक दल, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), बिजू जनता दल (बीजेडी), वायएसआर काँग्रेस, पक्षांना संबोधित केले. तसेच तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचा उल्लेख करत हे प्रादेशिक पक्षही आता कौटुंबिक पक्षात बदलले असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.

जातीच्या किंवा धर्माच्या आधारे ध्रुवीकरण
नड्डा यांनी टीएमसीचे “दीदी-भतीजे की पार्टी” असे वर्णन केले. तसेच झारखंडमध्ये बाबूजी म्हातारे झाल्यानंतर त्यांचा मुलगा (झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन) यांनी पक्षाचा ताबा घेतला आहे. नड्डा म्हणाले की, जे घराणेशाहीचे पक्ष आहेत, त्यांचे लक्ष्य केवळ सत्ता मिळवणे आहे. त्यांची कोणतीही विचारधारा नाही. त्यांचे कार्यक्रमही उद्दिष्टरहित असतात. तसेच प्रादेशिक पक्षांचे लक्ष्य हे आहे की, सत्तेत यावे. याचा अर्थ आणि त्यासाठी ते जातीच्या किंवा धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.


प्रादेशिक पक्ष हळूहळू काही लोकांच्या ताब्यात गेले आहेत आणि आता त्या प्रादेशिक पक्षांमधील विचारधारा बदलून कुटुंबे पुढे आली आहेत, असा आरोप नड्डा यांनी केला.