उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : अखेर भाजपला कायम सलत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने रविवारी मध्यरात्री अपेक्षेप्रमाणे अटक केली. शिवसेना-भाजपच्या ३० वर्षांच्या युतीत भाजपशी नाळ तोडून महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवणारा आणि भाजपच्या दृष्टीने ‘खलनायक’ ठरलेला नेता गजाआड गेला आहे.

‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर त्यांचे निकटवर्तीय झाले. शिवसेनेतील धोरणप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या राऊत यांनी केलेली वक्तव्ये आणि ‘सामना’तून केलेले लिखाण (दोन-तीन अपवाद वगळता) यांची ठाकरे यांनी कायम पाठराखण केली व चार वेळा राज्यसभेची खासदारकी दिली. मात्र राऊत यांचे भाजपशी असलेले संबंध कायम ताणलेलेच राहिले. भाजपशी युती असली तरी ठाकरे यांचे भाजप नेतृत्वाशी फारसे पटत नव्हते आणि अनेक मुद्दय़ांवर वाद झाले. त्या प्रत्येक वेळी  राऊत हे बिनीचे शिलेदार बनून आघाडीवर राहिले किंवा ठाकरे त्यांना पुढे करीत राहिले आणि भाजपशी असलेल्या संबंधांमध्ये कटुता येत राहिली.

भाजपने २०१४ मध्ये शिवसेनेशी २५ वर्षे असलेली हिंदूत्वाच्या मुद्दय़ावरील युती लोकसभा निवडणुकीनंतर तोडली. तेव्हापासून भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष उघडपणे सुरू झाला. 

देशात भाजप मोठय़ा भावाच्या भूमिकेत आला आणि शिवसेनेला छोटा भाऊ करून संपविण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू राहिले. त्यातून शिवसेनेचा विरोध वाढू लागला. राऊत यांनी भाजपबरोबर सत्तेत असतानाही वादग्रस्त, बेताल वक्तव्ये व लिखाण करून वारंवार भाजपचा संताप ओढवून घेतला.  पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावरही राऊत यांनी कायम टीका केली. त्यामुळे भाजप नेते राऊत यांना धडा शिकविण्याची वाट पाहात होते. राज्यात २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीत लढूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरून अखेरीस काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या घटनेत शिवसेनेचे ‘चाणक्य’ राऊत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच्या घनिष्ठ संबंधांचा वापर करून व काँग्रेसशी यशस्वी शिष्टाई करून राऊत यांनी हे सरकार स्थापन करण्यात मोठा वाटा उचलला. हा भाजपवर मोठा आघात होता आणि शिवसेनेचा राजकीय सूड उगविण्यासाठी भाजपने सातत्याने प्रयत्न केले. त्यातून शिवसेनेत एकनाथ शिंदे व ४० आमदारांचा गट आपल्या बाजूने वळविण्यात आणि राज्यात सत्ता काबीज करण्यात भाजपला यश मिळाले.