तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांवर आरोप

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निवडणूक लढवत असलेल्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांना तृणमूल काँग्रेसच्या कथित समर्थकांनी सोमवारी धक्काबुक्की केल्यामळे घोष यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला पिस्तूल बाहेर काढणे भाग पडले.

यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज्यातील राजकीय वातावरण तापले. निवडणूक आयोगाने या घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

भाजपच्या उमेदवार प्रियंका तिबरेवाल यांच्यासाठी प्रचार करताना पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या ‘परत जा’च्या घोषणांना सामोरे जावे लागले. एका रस्त्यावर घोष यांना धक्काबुक्की करण्यात येत असून, त्यांच्या सुरक्षारक्षकांचा ताफा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दृश्य राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दाखवले. तृणमूलच्या एका समर्थकाने सुरक्षारक्षकाची कॉलर पकडल्यानंतर त्याने जमावाला पळवून लावण्यासाठी पिस्तूल बाहेर काढल्याचेही यात दिसून आले. ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होत असलेल्या भवानीपूर मतदारसंघातील जोदुबाबूर बाजार भागातील एका लसीकरण शिबिरात घोष गेले असताना ही घटना घडली. त्यांनी निघून जावे अशी मागणी करत त्या ठिकाणच्या तृणमूल समर्थकांनी घोषणा दिल्या.