मराठी कविता विश्वातले नामवंत कवी सौमित्र (किशोर कदम) आणि वैभव जोशी आपली कविता बीएमएमच्या (बृहन्महाराष्ट्र मंडळ) आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत. जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्‍होड आयलंड इथं होणार्‍या बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनात त्यांचा ‘एक मी अन् एक तो’ हा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध गझलगायक दत्तप्रसाद रानडे या दोघांच्याही कविता सादर करतील तर संगीतकार/संगीतसंयोजक कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद त्यांच्या साथीला असेल.
संवेदनशील कलावंत म्हणून कवी सौमित्र यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे, तर ताज्या दमाचे कवी-गीतकार म्हणून वैभव जोशी प्रसिद्ध आहेत. या दोन कवींचे, त्यांच्या कवितेचे एकमेकांशी असलेले नाते ‘एक मी अन् एक तो’ या कार्यक्रमातून उलगडले जाते. एकमेकांच्या कवितांना पूरक आणि त्यांचे अर्थ पुढे नेणार्‍या तसेच अस्सल जीवनानुभव व्यक्त करणार्‍या कवितांची ही मैफल महाराष्ट्रात अनेक वेळा रंगली आहे. आता अमेरिकेतल्या रसिकांना बीएमएमच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे.
संगीत, काव्य, नृत्य तसेच नाट्याचा अविस्मरणीय सोहळा १६ व्या अधिवेशनात घडवून आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. ‘एक मी अन् एक तो’ हा कार्यक्रम या सोहळ्यातला एक महत्त्वाचा भाग आहे.
हा कविता-आधारित कार्यक्रम जगभरात पसरलेल्या कविताप्रेमींच्या पसंतीला उतरेल अशी आयोजकांना खात्री वाटते. बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी http://www.bmm2013.org इथे क्लिक करा. तर http://www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजद्वारे वेळोवेळी ताज्या घडामोडी मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे, त्याचाही रसिकांनी लाभ घ्यावा.