अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात नुकत्याच झालेल्या शिखरचर्चेच्या वेळी सुरुवातीचा मैत्रभाव काही वेळातच विरघळून पुढील चर्चा परस्परांना अडचणीच्या वाटणाऱ्या मुद्द्यांवर पंजे उगारण्यातच गेली. यातून एक बाब स्पष्ट झाली. ती म्हणजे, शीतयुद्धकालीन सोव्हिएतांपेक्षा आजचा चीन अधिक प्रबळ प्रतिस्पर्धी ठरू लागला आहेच, शिवाय त्या वेळी जवळपास समतुल्य असलेली आणि युद्धखोरी नखशिखान्त भिनलेली अमेरिका आज तशी राहिलेली नाही. त्यामुळे हळूहळू अजगरागत वेढा घालणाऱ्या चीनला प्रतिबंध करण्यासाठी वेगळी व्यूहरचना आखावी लागणार. नवीन मित्र नाही तरी नवीन समीकरणे जुळवावी लागणार. सोव्हिएत रशियाच्या विरोधात युरोपातील तुलनेने सधन देशांची मोट बांधणे व त्यांना ‘नाटो’ म्हणून संबोधणे आणि आता चीनच्या भोवताली मित्रराष्ट्रांची साखळी गुंफणे यात फरक आहे. परंतु हे करावेच लागेल, असे एलब्रिज कोल्बी या विश्लेषकाला वाटते. असे वाटणारे ते अर्थातच एकटे नाहीत. कोण हे कोल्बी?

एलब्रिज कोल्बी हे सामरिक अभ्यासक आहेत. त्यांची अगदी अलीकडची ओळख म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात ते उपसहायक संरक्षणमंत्री होते. ‘द स्ट्रॅटजी ऑफ डिनायल : अमेरिकन डिफेन्स इन अ‍ॅन एज ऑफ ग्रेट पॉवर कॉन्फ्लिक्ट’ या पुस्तकात त्यांनी चीनचा धोकादायक उदय, तैवानवर स्वामित्व सांगण्याच्या त्या देशाच्या अरेरावीतून उत्पन्न होणारे संभाव्य धोके व त्यांचे निराकरण करण्यासाठी अमेरिकेने काय करावे याविषयी सविस्तर ऊहापोह दिसून येतो. वर्षानुवर्षे सर्वशक्तिमान राहूनही जी अमेरिका पंडित नेहरूंच्या भाषेत ‘सतत सर्वाधिक भयग्रस्त’ राहात होती, त्या अमेरिकेमध्ये सध्याचे दोन प्रतिस्पर्धी – सोव्हिएतोत्तर चिवट राहिलेला रशिया आणि नवशक्तिमान चीन या दुहेरी आव्हानांमुळे अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे. कोल्बी मात्र तैवानच्या परिप्रेक्ष्यात चीनवर अधिक लक्ष केंद्रित करतात. एकही गोळी न झाडता जर्मनीने ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभी ऑस्ट्रियाला खालसा केले, तसेच काहीसे तैवानच्या बाबतीत संभवते अशी शक्यता ते व्यक्त करतात. एकदा तसे झाल्यास चीनच्या जोखडातून तैवानला मुक्त करण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्याबरोबरीने येतोच. तसे करण्यापासून चीनला परावृत्त करावे यासाठी जपान, द. कोरिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया या जुन्या मित्रांसमवेत भारत (कोल्बी यांच्या मते मोठी शक्ती), इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर या देशांविषयी कोल्बी आशावादी आहेत. रशियाचा ‘नाटो’ देशांवरील संभाव्य हल्ला अमेरिकेने वर्षानुवर्षे गृहीत धरला. परंतु त्या शक्यतेपेक्षा चीनकडून तैवान अलगद गिळंकृत होणे ही शक्यता अमेरिकेला आता अधिक वास्तव आणि भीतीदायक वाटू लागली आहे, हाच या पुस्तकाचा मथितार्थ.