Jasprit Bumrah Breaking News: भारतीय क्रिकेट संघाला टी२० विश्वचषका आधी खूप मोठा झटका बसला आहे. संघातील प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात टी२० मालिका खेळत आहे. मात्र, त्याआधीच भारतीय संघाला हादरा देणारी एक माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या खात्रीशीर सुत्रांनुसार भारतीय संघाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखण्यामुळे विश्वचषकच काय तर पुढचे पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही. अगोदर रविंद्र जडेजा आणि आता जसप्रित बुमराह या दोन्ही महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकणे आता निश्चितच सोपे नसणार आहे.

पुढील महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक सुरू होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे आशिया चषकमध्ये बुमराह खेळला नव्हता. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने कमबॅक केले होते.बुमराहने २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यात बुमराहने ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या. टी२० मधील ही त्याची सर्वात वाईट कामगिरी होती.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कालावधीतच खेळाडूंना दुखापत कशी होते असा मिश्किल प्रश्न चाहते विचारत आहेत. आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. तर सततच्या विश्रांतीमुळेच खेळाडूंचा फॉर्म जात असल्याचे अनेक दिग्गज म्हणत आहेत. अशा परिस्थितीत बुमराहची दुखापत भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारी आहे. यावरूनच चाहत्यांनी बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्माबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या सोबत आहे. निवड समिती त्याच्या जागी अन्य खेळाडूची टी२० विश्वचषक संघात निवड करण्याची शक्यता आहे. टी२० विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी अष्टपैलू रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.