दिल्ली येथील ट्वीन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती.ती इमारत पडतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.आता हीच कंपनी पुण्यातील चांदणी चौकातील पूल (उद्या ) रविवारी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास पाडण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की,हा पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजल्यापासून निर्मनुष्य करण्यास सुरुवात करीत आहोत. हा पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये. त्या दृष्टीने ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की,पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की,वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridge at chandni chowk will be demolished between 1 am and 2 am collector rajesh deshmukh svk
First published on: 01-10-2022 at 19:15 IST