वाई : वाई शहराच्या जडणघडणीचा साक्षीदार असणारा ब्रिटिशकालीन जुना पूल शुक्रवारी पाडण्यात आला. या जागी नवा पूल बांधण्यात येणार आहे. काल रात्रीच हा ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी दुपारीपर्यंत हे बांधकाम पडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. हे बांधकाम पाडले जात असताना वाईकरांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. या वेळी अनेकांडून या पुलाशी संबंधित आठवणींना उजाळा देत दुख व्यक्त केले जात होते.

दरम्यान हा पूल पाडताना मलाही वेदना आणि दु:ख होत आहेत. मात्र प्रत्येक वास्तूचे आणि व्यवस्थेचे एक आयुष्मान असते ते पूर्ण झाल्यामुळेच आपल्याला जुना पूल पाडावा लागत आहे. परंतु नवीन पूल हा वाई शहराला असणारा ऐतिहासिक वारसा आणि वैभव यांना अनुरूप असेल असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कृष्णा नदीच्या काठावर वरील घाटांवर दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. कृष्णा नदी सेवाकार्य समितीने स्वच्छता दुरुस्ती व डागडुजी केलेल्या ब्राह्मणशाही घाटावर आयोजित दीपोत्सव व भावगीत व सत्संग कार्यक्रमात पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.

या वेळी निवृत्त पोलिस अधिकारी आर आर पाटील, पुणे महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवले, उपअभियंता श्रीपत जाधव, साताऱ्याच्या उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संगीता राजापूरकर चौगुले, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रंजीत भोसले, माजी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, नायब तहसीलदार घोरपडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

डॉ. नितीन कदम यांनी नदी सेवा फाउंडेशनची माहिती नदी स्वच्छतेच्या उपक्रमाची माहिती चित्रफितीद्वारे दिली. काशिनाथ शेलार यांनी प्रास्ताविक केले. भारत खामकर, अमित सोहनी, डॉ. अमित जमदाडे व धनंजय मलटणे यांनी स्वागत केले. प्रियांका भिलारे व डॉ जितेंद्र फाटक यांनी भावगीते तर डॉ. सुश्मिता सनकी, शुभदा नागपूरकर व आर्ट ऑफ लिविंगच्या सहकाऱ्यांनी सत्संग केला. आभार प्रा. समीर पवार यांनी आभार मानले.