नवी दिल्ली : आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील राज्य सरकारांनी करोनाप्रतिबंधक निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच चाचण्यांची संख्या वाढवावी, असे केंद्र सरकारने बजावले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या राज्यांनी विषाणूची लागण होण्याचे साप्ताहिक प्रमाण आणि कमी होत चाललेल्या चाचण्या याकडे वेळीच लक्ष देत स्थितीचा आढावा घ्यावा. करोना नियमांचे नागरिकांकडून कसोशीने पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.  याबाबत केंद्रीय आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी आसाम आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना २६ ऑक्टोबरला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी या राज्यांत गेल्या आठवड्यापासून (२० ते २६ ऑक्टोबर) वाढत असलेले रुग्णांचे प्रमाण आणि गेल्या चार आठवड्यांपासून (२५ ऑक्टोबरपर्यंत) चाचण्या होकारार्थी येण्याच्या तुलनात्मक प्रमाणात झालेली वाढ, याकडे लक्ष वेधले आहे. 

केंद्राय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही २२ ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगाल सरकारला पत्र लिहून कोलकात्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. या महिन्याच्या आरंभी झालेल्या दुर्गापूजा उत्सवानंतर ही रुग्णवाढ दिसून येत आहे. आता आहुजा यांनी लिहिलेल्या पत्रात कोलकाता आणि हावडा जिल्ह्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली आहे. प. बंगालमध्ये यावेळी साप्ताहिक रुग्णसंख्येचे प्रमाण सुमारे ४१ टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 कोलकाता महापालिकेतील सूत्रांनी सांगितले की,  तातडीने  प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्याची योजना नाही, कारण त्यामुळे  रोजीरोटीवर विपरीत परिणाम होतो. रुग्णसंख्या वाढत गेली तर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्याबाबत विचार होऊ शकतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

उत्सवात निर्बंध धाब्यावर

कोलकाता आणि परिसरात सार्वजनिक दुर्गापूजा उत्सवात मंडप आणि मंडपाबाहेर भाविकांनी करोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसविले. शॉपिंग मॉलमध्येही हीच स्थिती होती. त्यामुळे राज्यात नव्याने करोना रुग्ण दिसून येत आहेत, असा तज्ज्ञांचा दावा आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने दुर्गा मंडपांना दिलेले अतिप्रोत्साहन आणि मंडळांच्या कार्यकत्र्यांना दिलेली आर्थिक मदत यामुळे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे काही भागांत नव्याने निर्बंध जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी सध्याच्या निर्बंधांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देणारा आदेश जारी केला.

मात्र आधी जाहीर केल्याप्रमाणे नववी ते बारावीचे वर्ग १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.