मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवार २६ सप्टेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार असून त्या दृष्टीने सोमवारी त्यांनी राज्यातील नक्षलवादी कारवाया आणि नक्षलवादी भागातील विकास कामांची सद्य:स्थिती व रखडलेल्या कामांबाबत आढावा घेतला. नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडेही वळत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार २६ सप्टेंबरला देशातील नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीला जाण्याची तयारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील नक्षलवादविषयक आढावा बैठक घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.