ज्या लोकांनी करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि ज्यांना परदेशात प्रवास करायचा आहे, त्यांच्याकडील कोविन लसीकरण प्रमाणपत्रावर त्यांची पूर्ण जन्मतारीख असेल, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले. तारीख “yyyy-mm-dd” (वर्ष-महिना-दिवस) स्वरूपानुसार असेल आणि ती आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकांनुसार असेल, असंही ते म्हणाले.

एएनआयशी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, “जसजसे जग व्यवसाय आणि प्रवासासाठी हळूहळू खुले होत आहे, तसतसे आंतरराष्ट्रीय प्रवासी तणावमुक्त प्रवास करू शकतील याची खात्री करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन जन्मतारखेचे स्वरूप WHO च्या मानकांनुसार आहे. तसेच, परदेशात प्रवास करणारा प्रत्येकजण त्यांच्या पासपोर्टनुसार जन्मतारीख टाकून लसीकरण प्रमाणपत्र अपडेट करू शकतात. त्यानंतर CoWin वरून त्यांना अपडेटेड लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल. सध्या प्रमाणपत्रात फक्त जन्माचे वर्ष दिसत असून त्यावरून त्या व्यक्तीचे वय लक्षात येते,” असंही शर्मा म्हणाले.

युकेने २२ सप्टेंबर रोजी अॅस्ट्राझेनेकाच्या भारतात तयार झालेल्या लसीचा त्यांच्या देशातील मंजुर लसींमध्ये समावेश केला. त्यानतर पुन्हा प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. दरम्यान, सुरुवातीला यूके सरकारने म्हटलं होतं की जर एखाद्या व्यक्तीचं आफ्रिका, दक्षिण अमेरिका, यूएई, भारत, तुर्की, जॉर्डन, थायलंड आणि रशिया या देशांमध्ये लसीकरण केले गेले असेल तर त्यांचं लसीकरण झालेलं नाही, असं मानलं जाईल आणि त्यांना अलगीकरणाचे नियम पाळावे लागतील, त्यानंतर भारतात या नियमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.