पेट्रोल व डिझेलचे दर शनिवारी सलग चौथ्या दिवशी लिटरला ३५ पैशांनी वाढवण्यात आले. यामुळे मे २०२० मध्ये इंधनांवरील कर वाढवण्यात आल्यापासून पेट्रोलच्या दरांत लिटरमागे ३६ रुपयांनी, तर डिझेलचे दर लिटरला २६.५८ रुपयांनी वाढले आहेत.

पेट्रोलचे दर आता दिल्लीत प्रति लिटर १०७.२४ रुपये, तर डिझेलचे दर ९५.९७ रुपये झाले आसल्याचे सरकारी तेल कंपन्यांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

तेलाचे आंतरराष्ट्रीय दर सतत वाढत असल्याने देशातही होत असलेल्या दरवाढीमुळे इंधनांचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले असून, अनेक राज्यांमध्ये डिझेलनेही ही पातळी गाठली आहे.

तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती बॅरलमागे १९ अमेरिकी डॉलर इतक्या कमी पातळीवर घसरले असताना त्यांचा फायदा ग्राहकांना देण्याऐवजी स्वत: घेण्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय किमती प्रति बॅरल ८५ डॉलरपर्यंत भडकल्या असताना, पेट्रोलवर लिटरमागे ३२.९ रुपये आणि डिझेलवर लिटरमागे ३१.८ रुपये इतके उत्पादन शुल्क कायम आहे.

इंधनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची मागणी म्हणजे स्वत:च्या पायावर कुºहाड मारून घेण्यासारखे आहे, असे तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी सांगितले. अशा प्रकारच्या करांतून मिळणाऱ्या निधीमुळेच लाखो लोकांना करोना लसी, भोजन आणि स्वयंपाकाचा गॅस मोफत देणे सरकारला शक्य होते, असे ते म्हणाले.