मुंबई : करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गैरव्यवहार झाल्याची तक्रार आझाद मैदान पोलिसांकडे केली होती.

माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मार्च २०२२ मध्ये न्यायालयात याप्रकरणी अर्ज केला होता. हा १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कंपनीला वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही वरळी आणि दहिसरमधील करोना केंद्राचे कंत्राट देण्यात आले.

हेही वाचा >>>सोन्याच्या तस्करीसाठी बनवला विशेष कोट ; सुदानमधील दोन नागरिकांसह तिघांना अटक ; – विमानतळावरून १० किलो सोने जप्त

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या कंपनीची सेवा रद्द करून त्यांची अनामत रक्कम जप्त केली होती. त्यांना कोणतेही कंत्राट देऊ नये, अशी सूचना करण्यात आली असतानाही या कंपनीने ही वस्तुस्थिती मुंबई महापालिकेपासून लपवून ठेवली आणि करोन केंद्रांमध्ये सेवा देण्याचे कंत्राट मिळवले. त्यासाठी बनावट कागदपत्रे, भागीदारी कागदपत्रेही सादर केली. या संपूर्ण कंत्राटात झालेल्या गैरव्यवहारातून कंपनीने महापालिकेकडून ३८ कोटी रुपये मिळवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, तिचे भागीदार डॉ हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या सर्वांवर फसवणूक विश्वासघात यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सुजीत पाटकर हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विश्वासू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा >>>लटके यांचा दोनदा राजीनामा ; राजीनाम्याचा घोळ मर्जीतील उमेदवारासाठी ; भाजपचा आरोप

आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष ४ कडे वर्ग करण्यात आले आहे. १० कोटी रुपयांवरील आर्थिक गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करते. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक शाखेला वर्ग करण्यात आला आहे.