प्रसिद्ध लोकशाहीर लीलाधर हेगडे यांचे निधन

हेगडे यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाकडे त्यांचे पार्थिव सोपवण्यात आले.

मुंबई : स्वातंत्र्य लढा, साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्र आदी चळवळींमध्ये सहभागी झालेले राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध शाहीर लीलाधर हेगडे यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

हेगडे यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाकडे त्यांचे पार्थिव सोपवण्यात आले. हेगडे यांना २०१४ साली अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. स्वातंत्र्य, समता आणि मानवतेची मूल्ये त्यांनी जपली आणि आपल्या शाहिरीतून त्यांचा प्रसार आणि प्रचार केला.  राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाचे शाहीर एवढीच लीलाधर हेगडे यांची ओळख नव्हती. महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एकाहूनएक सरस कलापथकांमुळे त्यांनी राष्ट्र सेवा दलाला देशभर

एक नवी ओळख मिळवून दिली. अस्पृश्यता निवारण चळवळीतील त्यांचे योगदानही मोठे होते. सांताक्रूझ येथील झोपडपट्टी परिसरात त्यांनी साने गुरुजींच्या नावाने आरोग्य मंदिर आणि शाळाही उभारली. हेगडे यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ लोकनाटकात रोंग्या हे पात्र त्यांनी साकारले होते.

श्रद्धांजली जोड

सेवा दलासह समाजातील विविध घटकांसाठी हेगडे यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांनी झोपडपट्टीत जाऊन केलेले काम आजही लक्षणीय आहे. – डॉ. गणेश देवी, अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल

लीलाधर हेगडे यांनी सेवा दलाच्या कलापथकाचे नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान मोठे होते.  – बाबा आढाव, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते

राष्ट्र सेवा दलाचा डफ आता शांत झाला आहे. शाहिरांनी गाणी, वगनाट्य या माध्यमातून समाज जागृतीचे काम के ले होते. या चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.  – हुसेन दलवाई, माजी खासदार 

शाहीर हेगडे यांनी रंजनाच्या माध्यमातून लोकशाही-समाजवादी तत्त्वांचा प्रसार के ला. वगनाट्यातून त्यांनी जनजागृती के ली होती. खडा आवाज हे हेगडे यांचे वैशिष्ट्य होते.  – डॉ. रत्नाकर महाजन, राज्य नियोजन आयोगाचे माजी कार्याध्यक्ष

लीलाधर हेगडे आणि आमचे कुटुंब काही वर्षे एकाच घरात राहिले. वसंत बापट, माझी आई आणि लिलीमामा (लीलाधर हेगडे) या त्रयीने राष्ट्र सेवा दल कलापथकाद्वारे अनेक कलाकार घडवले. माणसे घडवली, त्यातली मी एक.  – झेलम परांजपे, ज्येष्ठ नृत्य शिक्षिका

हेगडे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक कार्यात मोठा वाटा उचलला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमरशेख, आत्माराम पाटील यांच्यासह हेगडेही सहभागी झाले होते.  – गजानन खातू, परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Famous lokshahir liladhar hegde passed away akp

Next Story
रुपगर्वितेचे ‘इंग्लिश व्हिंग्लीश’
ताज्या बातम्या