प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या कमला भसीन यांचं आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झालं. महिला हक्क चळवळीच्या लढ्यात कमला भसीन यांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. दक्षिण आशियाई भागात भसीन यांनी महिला हक्क आंदोलन पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काही महिन्यांपूर्वीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. कमला यांच्या क्योंकि मै लडकी हू, मुझे पढना है या कविता विशेष लोकप्रिय होत्या.

त्यांच्या मृत्यूची बातमी कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. श्रीवास्तव यांनी लिहिले, “कमला भसीन, आमची प्रिय मैत्रीण, आज 25 सप्टेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास निधन झाले. भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील महिलांच्या चळवळीसाठी हा एक मोठा धक्का आहे. तिने कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आयुष्य जगली. कमला तू नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहशील. तुझी बहीण जी खूप दुखा:त आहे. “

१९७० च्या दशकापासून, भसीन भारतातील तसेच इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये महिलांच्या चळवळीतला एक प्रमुख आवाज आहे. २००२ मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ ची स्थापना केली, जी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित स्त्रियांसोबत काम करते, बहुतेकदा नाटक, गाणी आणि कला यांसारख्या साधनांचा वापर करते.

भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.