माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा सरकारने मंगळवारी रात्री केली. या घोषणेनुसार आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुनच काम करता येणार आहे. वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलै रोजी संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे. यासंदर्भातील माहिती दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्विटवरुन दिली आहे.

नक्की पाहा >> Work From Home मुळे दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा

“करोनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने घरुन काम करण्यासंदर्भातील अटी आणि नियमांमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शिथिल करण्यात आल्या आहेत,” असे ट्विट दूरसंचार विभागाने केलं आहे.

आयटी क्षेत्रातील ८५ टक्के कर्मचारी सध्या घरुनच काम करत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसंदर्भातील कर्मचारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करत आहेत. यापूर्वीही दूरसंचार विभागाने ३० एप्रिल रोजी वर्क फ्रॉम होमसंदर्भातील मुदत संपण्याआधीच ती ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान ही घोषणा केली होती.

नक्की वाचा >> “कायम घरुनच काम केलं तर…”; सत्या नाडेलांचा ‘पर्मनन्ट वर्क फ्रॉम होम’ला विरोध

सर्वात आधी १३ मार्च रोजी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. हा कालावधी आधी ३० एप्रिल आणि त्यानंतर ३१ जुलै रोजी संपणार होता. मात्र आता तो थेट ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच हा वर्क फ्रॉम होमचा कालावधी आता एकूण ९ महिन्यांचा झाला आहे.

नक्की वाचा >> कामावर येऊ नको सांगितले असतानाही कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसनेच मारला बुक्का

भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रभाव अधिक असल्याने या सवलतींचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.