रोगराईमुळे उत्पन्नात घट, मजुरीच्या वाढत्या खर्चाचे आव्हान

नाशिक : भाताचे आगर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भात सोंगणी अंतिम टप्प्यात आली आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेले भात पीक किडरोगाच्या प्रादुर्भावात आले असून तालुक्यातील भातपीक मोठय़ा प्रमाणात रोगराईने ग्रासले असल्याने उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.

परतीच्या पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यापुढे आता वाढलेल्या मजुरीच्या खर्चाचे आव्हान आहे. यामुळे सोंगणी करणे देखील तोटय़ाचे होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाचे शेतकऱ्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून गतवर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तालुका कृषी खाते आणि पंचायत समितीचा कृषी विभाग अशा दोन यंत्रणा असतानाही तालुक्यातील बळीराजा दुर्लक्षित आहे.

संकट येताच परस्परांकडे बोट दाखविले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून तालुक्यात सुरक्षित फवारणी कशी करावी हे चित्ररथाव्दारे सांगितले जात असताना अतिपावसाने आलेल्या संकटाला कसे तोंड देणार? याचे उत्तर त्यांच्याकडून मिळत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.

नागली, वरई खुरसणी आदी पिकांची लागवड कधीच कमी झालेली आहे. यावर्षी पेरणीक्षेत्र २७ हजार ५६० हेक्टर इतके आहे.साधारणत: १० वर्षांपूर्वी ३० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते. ते कमी होत २७ हजार झाले आहे. पीक रोगराईने ग्रासलेल्या शेतकऱ्यास पीकविमा संरक्षणाचा आधार मिळेल, मात्र यावर्षी १० टक्क्यांच्या आसपास पीक विमा आहे. मागील काही र्वष नुकसान होऊन देखील पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत उदासीनता वाढली आहे. पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतचा खर्च दिवसोंदिवस वाढत असून यावेळेस औषधांच्या खर्चाचा भुर्दंड आल्यामुळे तोटा वाढला आहे. एकरी खर्च यांत्रिक शेतीने वाढला असून पेरणीपूर्व मशागत आणि आवणी यास किमान चार हजार रुपये टॅक्टर मजुरी लागत आहे. मजुरी खर्च साधरणत: आवणीसाठी १० हजार रुपये, निंदणीसाठी तीन हजार रुपये, सोंगणीसाठी सहा हजार रुपये असा आहे.

बी-बियाणे, खते यांना दोन हजार रुपये असा सरासरी एकूण २५ हजार रुपये खर्च येतो. यामध्ये वाढच होत आहे. भाताचे एकरी उत्पन्न १० क्विंटलच्या आसपास आहे. मुरमाड जमिनीत ते यापेक्षा कमी येते. तालुक्यातील जमिनीची प्रतवारी पाहता हळीव वाणाच्या भाताचे प्रमाण अधिक आहे. हळय़ा भातांना भाव कमी मिळतो. भाताला प्रति क्विंटल १५००-१८०० रुपये भाव मिळाला तरी देखील अवघे २० हजार रुपये हाती पडत आहेत. 

इगतपुरी तालुक्याचे प्रमुख पीक समजल्या जाणाऱ्या भात शेतीला रोगाने ग्रासले असून भात शेती करणे देखील तोटय़ाचे झाले आहे. मजुरीचे दाम दुप्पट झाल्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे.

निवृत्ती जाधव (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना)

भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. वेळोवेळी पडणाऱ्या पावसाने पिकांना चांगली साथ दिली. परंतु कडपा, तुडतुडया आदी रोगांनी भात पिकाला मोठी हानी पोहचवली आहे. भरभरून आलेले पीक रोगाने वाया गेले आहे. त्यातच मजुरीदेखील डोईजड झाली आहे

सोमनाथ जोशी ( सभापती, पंचायत समिती इगतपुरी)