मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दिवशी भाजपच्या १२ निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा म्हणून विधान भवनाच्या बाहेर स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने विधिमंडळ सचिवालयाला दिला आहे.

विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या आमदारांना निलंबन काळात विधान भवनात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आमदार निलंबित झाले तरीही त्यांना राज्यसभा किं वा विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता येतो.

यापूर्वी मनसेच्या निलंबित आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविला होता.  तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी खास बाब म्हणून या आमदारांना मतदानासाठी विधानभवनात प्रवेश दिला होता, असे विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.