नवी दिल्ली : सरलेल्या जुलै महिन्यात देशात होणारी आयात आणि देशाकडून होणारी निर्यात यातील तफावत अर्थात व्यापार तूट विक्रमी ३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर व्यापार तूट तब्बल तिपटीने वाढली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून मोठय़ा प्रमाणावर आयात करण्यात येणाऱ्या खनिज तेलाच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत तूट वाढली आहे. जुलै महिन्यात देशातून झालेल्या निर्यातीत गत वर्षांच्या तुलनेत २.१४ टक्क्यांची वाढ होऊन, ती ३६.२७ अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचली आहे. तर आयात ४३.६१ टक्क्यांनी वाढून ६६.२७ अब्ज डॉलर झाली आहे. एकीकडे देशाची निर्यात वाढत असली तरी आयातीत त्यापेक्षा अधिक वाढ होत आहे आणि या दोहोतील तफावत म्हणजे व्यापार तूट महिनागणिक वाढत चालली आहे. जुलै महिन्यात व्यापार तूट वाढत ३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सलग काही महिन्यांपासून व्यापार तूट वाढती राहिली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात (जुलै २०२१) ती १०.६३ अब्ज डॉलर होती. तर जून २०२२ मध्ये ती  २६.१ अब्ज डॉलर राहिली होती.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि वस्तूंच्या किमती उच्च राहिल्याने, नजीकच्या काळात व्यापार तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम उत्पादनांची आयात जुलैमध्ये दुपटीने वाढली आहे. ती गेल्या वर्षीच्या १२.४ अब्ज डॉलरवरून थेट २१.१३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. रशियाकडून खनिज तेलाची कमी दरात आयात करण्यात येत असली तरी ती एकूण आयातीच्या अल्प आहे. याचबरोबर कोळसा, कोक आणि ब्रिकेट्सची आयात वार्षिक दुपटीने वाढून जुलै महिन्यात ५.२ अब्ज डॉलरवर पोहोचली. दरम्यान सोने आयातीत घसरण झाली आहे. यंदाच्या जुलैमध्ये ती वार्षिक तुलनेत ४३.६ टक्क्यांनी कमी होऊन २.३७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात ४.२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती.

तिमाहीतील कामगिरी कशी?

चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल-जुलै या चार महिन्यात निर्यात २०.१३ टक्क्यांनी वाढून १५७.४४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर आयात ४८.१२ टक्क्यांनी वाढून २५६.४३ अब्ज झाली आहे. गेली वर्षी म्हणजेच एप्रिल-जुलै २०२१-२२ या कालावधीत तूट ४२ अब्ज डॉलर नोंदण्यात आली होती. त्या तुलनेत त्यात दुपटीने वाढ होत ती ९८.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

परकीय गंगाजळीत घसरण कायम

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत घसरण कायम असून ५ ऑगस्ट रोजी सरलेल्या आठवडय़ात गंगाजळी ८९.७ कोटी डॉलरने आटत ५७२.९७८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर (२०२१) महिन्यात परकीय चलन गंगाजळीने ६४२.४५३ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर भांडवली बाजारात नवीन वर्षांत आलेली घसरण, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे त्यात घसरण कायम आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मूल्य घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करत असल्याने परकीय चलन गंगाजळीत उतार कायम आहे.