‘‘देश स्वतंत्र होण्यापूर्वीच जयप्रकाश नारायण म्हणत असत की, ‘सन १९४२ की क्रांती अधूरी है, हमें और आगे जाना है’. या पुढच्या तयारीचा भाग म्हणजे कलापथक’’ अशी वैचारिक स्पष्टता लीलाधर हेगडे यांच्याकडे स्वातंत्र्याच्या उदयकाळातच होती. वयाच्या पंधराव्या वर्षी बेचाळीसच्या लढ्यात उतरलेल्या शाहीर लीलाधर हेगडे यांनी विशीच्या उंबरठ्यावर असताना, १९४६ च्या क्रांतिदिनी ‘महाराष्ट्र शाहीर पथका’चा कार्यक्रम नाशकात गाजवला; तेव्हापासून अगदी २०१६ पर्यंत ‘शाहीर’ हीच त्यांची ओळख ठरली. गोष्टी-गाणी हे प्रेरणांचे स्त्रोत असतात, अशा खूणगाठीतून त्यांनी कुमारांसाठी लेखनही केले. राष्ट्र सेवा दलाचे कलापथक आणि साने गुरुजी आरोग्यमंदिर ही बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या उभारणीत, जोपासनेत हेगडे यांचा वाटा मोठाच. यापैकी कलापथकाच्या संघटित स्वरूपाची उपयुक्तताच आजच्या समाजमाध्यमी जगात पालटून गेली आहे; पण साने गुरुजींच्या प्रेरणा जिवंत ठेवणारे सामाजिक-शैक्षणिक काम जिवंत ठेवण्याची गरज आजच्या तरुणांनाही पटते आहे. त्यामुळे लीलाधर हेगडे यांच्या निधनानंतरही संस्थेचे काम सुरूच राहील. पण विदर्भ, खान्देशपासून तळकोकणापर्यंतच्या अशा अनेक संस्था चालवणाऱ्यांना, किंवा ‘प्रचारकी’ न होता लोकाभिमुखपणे समतावादी- संविधाननिष्ठ प्रबोधन करू पाहणाऱ्या साऱ्याच मराठी कलावंतांना, आपला वारसा केवढा समृद्ध होता याचे भान राखण्यासाठी लीलाधर हेगडे यांच्याकडे पाहावेच लागेल. खुद्द लीलाधर हेगडे यांच्याकडे हा वारसा जयप्रकाश नारायण, साने गुरुजी- या दोघांचे समकालीन रावसाहेब पटवर्धन, आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, एसेम जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्याकडून आला. म्हणूनच एसेम जोशींच्या प्रेरणेतून श्रीरामपुरात उभे राहिलेले वाचनालय, पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील आंतरभारती आणि मुंबईच्या सांताक्रूझ उपनगरात हेगडे यांच्यामुळे वाढत राहिलेली संस्था या भिन्न असूनही तशा वाटत नाहीत. ‘नेटवर्किंग’चा काळ तो फक्त आमचाच, असे आजच्या पिढीला वाटतही असेल; पण राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कलापथकाने महाराष्ट्रभर- आणि १९६३ नंतर तर जवळपास देशभर- जे काम केले तो नेटवर्किंगचाच उत्तम नमुना होता. वसंत बापट, आवाबेन देशपांडे, लीलाधर हेगडे आणि सुधाताई वर्दे हे या कलापथकाच्या स्थापनेपासून कार्यरत होते. अर्थात, त्याआधी राष्ट्र सेवा दलाचा शाखाविस्तार झालेला होताच; परंतु या शाखांमध्ये येणाऱ्या बाल-तरुणांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या पलीकडे कलापथक पोहोचले. समतावादी समाजवादाला या मातीचा गंध देण्यात जसा शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे यांचा वाटा आहे, तसाच शाहिरीच्या पलीकडल्या महाराष्ट्रीय लोककलांना वैचारिक व्यासपीठावर आणण्यात या कलापथकाचा महत्त्वाचा वाटा आहे. या योगदानामागे हेगडे यांच्यासारख्या खंद्या कार्यकर्त्यांची योजकता होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या सत्याग्रहाशी लोकांचा संबंध काय हे शाहीर या नात्याने अवघ्या मराठी मुलखात सांगण्यासाठी लीलाधर हेगडे यांनी हा मुलूख पिंजून काढला होता, तो अनुभव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राष्ट्र सेवा दल कलापथकाच्या कामी आला. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी या राज्यात जिल्हे २२ आणि राष्ट्र सेवा दलाची उत्तमरीत्या काम करणारी कलापथके किमान २५, अशी स्थिती होती. या सर्वांशी समन्वय साधणारे, उमेद वाढवणारे ‘मध्यवर्ती कलापथक’! त्यातही खऱ्या अर्थाने समाजवाद जपणारे ‘नेटवर्किंग’ कसे होते? लीलाधर हेगडे यांच्याच शब्दांत, ‘‘… उत्तम ढोलकीवादक भागोजी बैकर… मुलुंडच्या झोपडपट्टीत राहायचा आणि एका पानठेल्यावर पार्टटाइम बसायचा… सुरुवातीच्या काळात मधु तांबे असायचा, तो फोर्टातल्या ‘आराम’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक होता. (वसंत) बापट तर प्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक होते; तर आपापले उद्योग सांभाळून येणारे नोकरदार होते, शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेली मुलेमुली होती. रामगोंडा पाटील शेतकरी होता, (राम) नगरकर पोस्टात होता तर निळू (फुले) पुण्यात लष्करी मेडिकल कॉलेजात माळीकाम करत होता. पुढे वेसाव्याहून पाच तरुण मुले कलापथकात दाखल झाली. ती सर्व वेसावे मच्छीमार सेवा संघाशी संबंधित होती. त्यामुळे शिस्तीचे भान होते…’’ – वरवर पाहाता हे स्मरणरंजन; पण राष्ट्र सेवा दलाने तमाशाचा ‘फॉर्म’ वापरून केलेल्या प्रबोधनात अनेक भाषांचा लहेजा, अनेक नृत्यांची सळसळ कशी अस्सल होती हेही सांगणारे! याला नेटवर्किंग म्हणा किंवा नका म्हणू; हेगडे जिथे जात, तिथे कार्यकर्त्यांचे जाळे जोडत. कार्यकर्ता नाही, गाणारा नाही- एवढेच कशाला, १९८० च्या दशकानंतर तर ‘फार विचारही करत नाही’ अशा तरुण वर्गावरसुद्धा हेगडे यांचा प्रभाव पडे. ‘वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव…’ ही लीलाधर हेगडे यांची खड्या आवाजातली साद आणि ‘वल्हवली’ असा यच्चयावत् उपस्थितांकडून त्याच तालात मिळणारा प्रतिसाद हे बहुतेकांना अद्भुत- अलौकिक वाटायचे! पण त्यामागे हेगडे यांच्या वैचारिक निष्ठा, क्षमता आणि परिश्रम, स्वभावात असलेला खुलेपणा यांचे पाठबळ होते हे आजही जे ओळखतील, ते लीलाधर हेगडे यांनी पाण्यात सोडलेली नाव यापुढेही नेटाने वल्हवत ठेवू शकतील.