सिनेमातले नायक नायिका  आपल्या सगळ्यांनाच आवडतात. आपला आवडता हीरो आणि हीरोईनसुध्दा  ठरलेले असतात. आपण जसं आपल्या आयुष्यात पुढे जात राहतो तसा आपल्या मनातला हा हळवा कोपराही आणखी स्पेशल होत जातो. याला कोणीही अपवाद नाही. अगदी बडे नेते, अधिकाऱ्यांपासून कोणीही अपवाद नसतो. पण आपल्या मनातल्या या भावनांना जाहीरपणे वाट शक्यतो कोणी करत नाही. राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि महत्त्वाची व्यक्तिमत्त्व याबाबतीत आणखीनच ‘सिक्रेटिव्ह’ असतात.

पण सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनी अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्याविषयीच्या त्यांच्या भावनांना फेसबुकवर वाट करून दिल्याने आता त्यांच्या या पोस्टबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘माझं जयललितांवर क्रश होतं’ हे शब्द एका माजी न्यायमूर्तींकडून जाहीरपणे येत आहेत यावर चटकन विश्वास बसत नाही.

‘जयललितांचा जन्म १९४८ सालचा तर माझा जन्म १९४६ चा’ जस्टिस काटजू पुढे लिहितात. ‘माझी आणि त्यांची भेट २००४च्या नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा झाली. त्यावेळी मी मद्रास हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेत होतो. त्यांच्याविषयी माझ्या मनात जी प्रेमाची भावना होती ती अर्थातच मी त्यांना सांगू शकत नव्हतो. कारण असं करणं अतिशय अयोग्य ठरलं असतं’

आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राजकारणात येण्यापूर्वी जयललिता अभिनयक्षेत्रातल्या एक अतिशय गाजलेल्या अभिनेत्री होत्या. त्यांचे लाखो फॅन्स देशभार पसरले आहेत. त्यांचं ‘फॅन फाॅलोईंग’ एवढं जबरदस्त होतं की याआधी अनेकदा फक्त त्या आजारी पडल्या आहेत अशी बातमी बाहेर पडली की त्यांच्या अनेक ‘फॅन्स’नी आत्महत्यासुध्दा केल्या आहेत. शेवटी जयललितांनाच त्यांच्या हाॅस्पिटलमधून पत्रक काढत आत्महत्येसारखं पाऊल कोणी उचलू नये यासाठी आवाहन करावं लागलं आहे .

पण अलीकडे जस्टिस काटजूंसारख्या हायप्रोफाईल व्यक्तिमत्त्वाने जयललितांविषयीच्या भावना सोशल मीडियातून बोलून दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे. वाचा फेसबुकवरची त्यांची संपूर्ण पोस्ट

आता माजी न्यायमूर्तींनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं की करू नये यावर जोरदार चर्चा झडतीलही. पण सोशल मीडियातून स्वत:च्या भावनांना मोकळी वाट ही मोठी माणसंसुध्दा करून देत आहेत हेही नसे थोडके