राज्यामध्ये मागील दोन दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या विरुद्ध ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ असा संघर्ष सुरु असून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी याच प्रकरणावरुन सोमय्या यांना आजचा कोल्हापूर दौरा रद्द करावा लागलाय. आता या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या वादावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती असं शिवसेनेच्या सुत्रांनी सांगितल्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांना सोमय्यांविरोधातील या संपूर्ण कारवाईची काहीच कल्पना नव्हती असं शिवसेनेच्या सुत्रांनी म्हटलंय. याचवरुन फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होत, असं मत फडणवीस यांनी नोंदवलं आहे. “आता ते दोन पक्षच याबद्दल सांगू शकतात,” असं फडणवीस म्हणाले. तसेच “असं असू शकतं की गृहमंत्र्यांना माहिती नसेल आणि थेट गृहमंत्र्यांनी ती कारवाई केली असेल. पण मग माझं मत असंही ही चुकीची कारवाई चाललीय असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबली पाहिजे होती,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

तसेच या प्रकरणासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी भाजपाची भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरु राहील असं म्हटलं आहे. “मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं असेल की एखादा व्यक्ती म्हणतो की मी भ्रष्टाचाऱ्याच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करायला जातोय असं म्हणतो आणि पोलीस त्याला अडवतात. कारण सांगितलं जातं की ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतामध्ये या प्रकारची कायदा सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. एकूणच जे काही सुरु आहे ते भयानक आहे. पण भारतीय जनता पार्टी थांबणार नाही. सातत्याने भाजपाची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सुरुच राहील,” असं फडणवीस म्हणाले.