गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या गटात सामील व्हावं, यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी सभा आणि मेळावे आयोजित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाषण करताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी करोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं.

उद्धव ठाकरे यांनी करोनाकाळात इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत उत्तम काम केलं आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे करोना संसर्ग वाढू शकतो, हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात आधी मुंबईतील विमानतळ बंद केलं होतं. पण त्यानंतर करोना विषाणूने हळूहळू सर्वत्र हातपाय पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही वरळीचा कोळीवाडा परिसर बंद केला. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून उत्तप्रकारे सर्व परिस्थिती हाताळली.

हेही वाचा- “…तर आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करू” महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत राहुल शेवाळेंचं मोठं विधान

आज अनेकांची थोबाडं चालत आहेत, अनेकजण बोलत आहेत की हिंदुत्वाचा सण साजरं करणारं सरकार आलंय. पण त्यांना कल्पना आहे का? उद्धव ठाकरेंनी त्यावेळी करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळली नसती, तर प्रत्येक घरात मृतदेह पाहायला मिळाला असता. पण उद्धव ठाकरेंनी ही स्थिती चांगल्याप्रकारे हाताळली. मला अनेक शिवसैनिकांचे फोन येतात, ते माझ्याकडे रडतात. ते म्हणतात, आम्ही या सगळ्यांना निवडून दिलं, असं काय कमी पडलं, ज्यामुळे त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली? अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

हेही वाचा- “याचा मेंदू सडलाय आणि डोकं…” एकेरी उल्लेख करत रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल!

बंडखोर आमदारांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढचे मूळ शिवसेनेतील नेते आहेत. बाकी सर्वजण इतर पक्षातून गद्दारी करून आलेले आमदार आहेत. तेच आज आम्हाला शिकवत आहेत, अशी टीकाही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.