माणसाने अनेक वर्षांपासून आपल्या हव्यासापोटी निसर्गाकडून काहीना काही ओरबाडून घेतले आहे आणि निसर्गाची हानी केली आहे. आज मात्र प्राणी, पक्ष्यांचे संवर्धन करण्याची वेळ त्याच्यावरच आली आहे. अशा प्रकारच्या संवर्धनामुळे प्रजाती तगून राहण्यास हातभार लागतो. विविध प्रजातींतील जीवांची संख्या वाढते आणि माणसालाही त्याचा फायदा करून घेता येतो. याबाबतचे उदाहरण सांगायचे झाले तर समुद्री कासवांचे संवर्धन कार्य!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूणच्या ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास या गावी २००२ मध्ये कासव संवर्धन मोहीम सुरू केली. कोकणात सागरी कासवांच्या अंडय़ांची चोरी आणि तस्करी होत असे. ही चोरी थांबवणे हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश होता. या उपक्रमातून स्थानिक जनतेला उपजीविकेची साधने मिळाली. गावातील ८० टक्के रहिवाशांना यामुळे काही काळापुरता का होईना, पण रोजगार मिळत आहे.

सागरी कासवांची अंडी सुरक्षित ठेवून त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना पाण्यापर्यंत सोडण्याची जबाबदारी गावातील दोन व्यक्तींवर सोपवण्यात आली आहे. त्यांना वन विभाग (कांदळवन कक्ष), मुंबई यांच्याकडून मानधन मिळते. या कार्यक्रमांतर्गत ग्रामसभेने ‘या गावात कोणीही हॉटेल बांधणार नाही, परंतु येणाऱ्या पर्यटकांची होम स्टेमध्ये उत्तम निवास व भोजन व्यवस्था होईल,’ असे ठराव केले आहेत. त्यामुळेच आज या गावात ४० होम स्टे आहेत. त्यातून स्थानिकांना अर्थार्जनाची संधी मिळाली आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्यामुळे नवीन घरांत निवासव्यवस्था केली जात आहे. कासवांच्या या प्रजननकाळात गावातील बंद घरेही भाडेतत्त्वावर घेऊन त्यात निवासव्यवस्था केली जाते. त्यातून घरमालकांनाही काही प्रमाणात उत्पन्न मिळते.

या घरांमध्ये मदतीला गावातूनच काही मजूर बोलावले जातात, त्यांनाही या कामाचा मोबदला मिळतो. गावातील तरुणांच्या राहणीमानाच्या स्तरात यामुळे सुधारणा झाली आहे. अनेक जण चारचाकी गाडय़ा विकत घेऊन पर्यटकांना कासवे आणि आसपासचा परिसर दाखवण्यासाठी नेतात. शाळकरी व महाविद्यालयीन मुले पर्यटकांना गावात पक्षी निरीक्षणासाठी घेऊन जातात आणि काही प्रमाणात पैसे गाठीशी बांधतात. गावामधील महिला बचत गट काही उत्पादने तयार करून, त्यांची विक्री या काळात करतात. पर्यटकांकडून या मालाला चांगला उठाव असतो. फळविक्री, सरबतांची विक्री केली जाते. गावातील जवळपास सर्व वयोगटांतील व्यक्तींना कासव संवर्धनामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदा होत आहे. निसर्गाचे नियोजनबद्ध संवर्धन केल्यास माणसालाही कसा फायदा होतो, हे यातून दिसून येते.

– मोहन उपाध्ये

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal nature conservation nature loss animals birds ysh
First published on: 15-06-2022 at 00:02 IST