बाली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि युवा लक्ष्य सेनने इंडोनेशिया मास्टर्स बँडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

जागतिक स्पर्धेतील गतविजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगवर २१-१५, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात केली. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कातेथोंगने सिंधूला चांगली झुंज दिली. मात्र, १९-१८ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी असताना सिंधूने पुढील दोन्ही गुण मिळवत हा गेम २१-१९ असा जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित सिंधूचा पुढील फेरीत स्पेनच्या क्लारा अझुर्मेंडीशी सामना होईल.

पुरुष एकेरीत, २० वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या जपानच्या कांटा त्सुनेयामाला २१-१७, १८-२१, २१-१७ असा पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे अग्रमानांकित जपानच्या केंटो मोमोटाचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत, सात्त्विक आणि चिराग या भारताच्या सहाव्या मानांकित जोडीचा मलेशियाच्या ओंग येव सिन आणि टेओ ए यिने १७-२१, १५-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला.