भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे वरिष्ठ सल्लागार आणि आघाडीचे संशोधक असणाऱ्या डॉ. तपन मिश्रा यांनी मागील तीन वर्षांमध्ये तीन वेळा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला आहे. ५ जानेवारी रोजी तपन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी धक्कादायक आरोप केलेत. बाहेरच्या लोकांना इस्रोच्या संशोधकांनी प्रगती करावी आणि कमी खर्चामध्ये टीकणारी उपकरणे, तंत्रज्ञान निर्माण करावे असं वाटतं नसल्याचा आरोपही तपन यांनी केलाय. अशाप्रकारचा हल्ला हा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेला गुप्त हल्ला असल्याचा दावा तपन यांनी केलीय. तपन यांनी डॉ. विक्रम साराभाई यांच्या रहस्यम पद्धतीने झालेल्या मृत्यूचा दाखला देत केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलीय.

तपन हे सध्या इस्रोमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या काही आठवडे आधीच सोशल मीडियावर त्यांनी लाँग केप्ट सीक्रेट म्हणजेच दिर्घकाळापासूनचं गुपित या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केलीय. जुलै २०१७ साली देशांतर्गत सुरक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांनी आपली भेट घेऊ आर्सेनिकच्या माध्यमातून विषप्रयोगाची भीती व्यक्त करत सावध राहण्याचा दिल्याचं या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“बऱ्याच दिवसांपासून हे रहस्य लपून राहिलं होतं. मात्र आता ते सार्वजनिक करावं लागत आहे. पहिल्यांदा २३ मे २०१७ रोजी बंगळुरुमधील मुख्यालयाच्या प्रमोशनसंदर्भातील मुलाखतीमध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साइड देण्यात आलं. हे दुपारच्या जेवणाच्या वेळी डोश्यासोबतच्या चटणीमध्ये मिसळवण्यात आलं होतं. कारण मग ते जास्त काळ माझ्या पोटात राहून शरीरात पसरुन रक्ताच्या गुठळ्या निर्माण व्हाव्यात आणि हृयविकाराच्या झटक्याने मृत्यू व्हावा असा उद्देश होता. मात्र मला ते जेवण फारसं आवडलं नाही. मी त्या डोश्यासोबत थोडी चटणी खाल्ली होती. त्यामुळेच याचा जास्त परिणाम नाही झाला. मात्र दोन वर्ष यामुळे रक्तस्त्राव होण्याचा बराच त्रास मला झाला,” असं या पोस्टमध्ये तपन यांनी म्हटलं आहे.

“दुसरा हल्ला चंद्रयान-२ ची मोहीम लॉन्च करण्याच्या दोन दिवस आधी झाला. १२ जुलै २०१९ रोजी हायड्रोजन साइनाइडच्या मदतीने मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एनएसजी अधिकाऱ्याने वेळीच दखल घेतल्याने जीव वाचला. उच्च सुरक्षा यंत्रणा असणाऱ्या माझ्या घरात सुरुंग खोदून विषारी साप सोडण्यात आले. तिसऱ्यांदा सप्टेंबर २०२० मध्ये आर्सेनिक देऊन मला मारण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मला श्वसनासंदर्भातील गंभीर आजार, त्वचेसंदर्भातील आजार, न्यूरोलॉजिकल तसेच फंगल इन्फेक्शनसंदर्भातील समस्या जाणवू लागल्या,” असा दावा तपन यांनी पोस्टमध्ये केलाय.

“दोन वर्षांपासून घरात कोब्रा, करैतसारखे विषारी साप आढळून आलेत. या सापांपासून संरक्षण करण्यासाठी घरात दर १० फुटांवर कार्बोलिक अ‍ॅसिडच्या सुरक्षा जाळ्या लावल्यात. त्यानंतरही घरात साप आढळून येत आहेत. एकदा घरामध्ये एल आकाराचा खड्डा सापडला. याच खड्ड्यामधून साप सोडण्यात येत होते. माझा लवकरात लवकर मृत्यू व्हावा अशी काहींची इच्छा आहे ज्यामुळे ही रहस्य माझ्यासोबत कायमची नष्ट होतील. मला आणि माझ्या कुटुंबाला देशाने वाचवावं,” असंही तपन यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.