करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के इतका लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेमध्ये दिली. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार होता. मात्र एकाचवेळी अनेकांनी निकाल पाहण्यासाठी साईटला भेट दिल्याने निकालाची वेबसाईट क्रश झाली. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यासाठी जास्त निकाल लागल्याने असं झाल्याचं मत व्यक्त केलं.

पत्रकारांनी अजित पवारांना दहावीचा निकाल पाहण्यास पालक आणि विद्यार्थ्यांना साईट क्रॅश झाल्यामुळे अडचणी येत असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी, यंदा दहावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत त्यामुळे विक्रमी निकाल लागला. त्यामुळे सगळेच निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचाच परिणाम म्हणून कधीकधी वेबसाईटवर लोड येवू शकतो, असं मत व्यक्त केलं. तसेच साईटवरील लोड कमी झाला की निकालाची साईट पुन्हा सुरळीत होईल, असंही अजित पवार म्हणाले.

नक्की पाहा >> Viral Memes : ९९.९५ पास… अरे निकाल आहे की डेटॉल? ती ०.०५ पोरं नापास झालीच कशी?

दुपारी एक वाजल्यापासून निकाल जाहीर होऊनही साईट क्रॅश झाल्यामुळे तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागल्याचं चित्र दिसून आलं. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट चार तासांहून अधिक वेळ डाऊन झाल्यात. हे वृत्त देईपर्यंत वेबसाईट सुरु झाल्या नव्हत्या.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा निकालासाठी result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक http://www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर साईट डाऊन असल्याचे नोटीफिकेशन दाखवले जात असल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले.

जाणून घ्या – Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त म्हणजेच १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे.

राज्यातील नऊ विभागांचा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.